बेळगाव लाईव्ह :सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाची ई -कमिटी आणि सन्माननीय कर्नाटक उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार बेळगावच्या नव्या जिल्हा न्यायालय संकुलात स्थापण्यात आलेल्या ‘ई -सेवा केंद्र /हेल्प डेस्क आणि व्हीसी केबिन सर्व्हिस सेंटर’चा उद्घाटन समारंभ आज सोमवारी सकाळी उत्साहात पार पडला.
सदर समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगावच्या मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एल. विजयालक्ष्मी देवी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते फीत कापून या नव्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बेळगाव जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सेक्रेटरी मुरली मोहन रेड्डी, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण आदी मान्यवरांसह न्यायालय व्यवस्थापक, सॉफ्टवेअर तंत्रज्ञ, जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी, निमंत्रित आणि हितचिंतक उपस्थित होते.
या केंद्राद्वारे न्यायालयाशी संबंधित वकील आणि सार्वजनिक याचिकाकर्त्यांना नागरिक केंद्रित सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ई -सेवा केंद्र /हेल्प डेस्कच्या माध्यमातून न्यायालयाचे ठिकाण, खटल्याच्या स्थिती संदर्भातील चौकशीची हाताळणी, सुनावणीची पुढची तारीख आणि इतर तपशील या सेवा उपलब्ध करून दिल्या जातील.
या केंद्राद्वारे कोणत्याही खटल्याबाबतचा अर्ज किंवा दावा दाखल करता येणार आहे. या केंद्रामुळे एखाद्याला प्रत्यक्ष न जाता मोबाईल लॅपटॉप किंवा संगणकाच्या सहाय्याने खटला दाखल करता येईल. आपल्या उद्घाटनपर भाषणात मुख्य न्यायाधीश एल. विजयालक्ष्मी देवी यांनी सदर केंद्राचा न्यायालयाशी संबंध येणाऱ्यांनी तसेच वकीलवर्गाने जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले.
जेएमएफसी न्यायालय इमारतीतील या ‘ई -सेवा केंद्र /हेल्प डेस्क आणि व्हीसी केबिन सर्व्हिस सेंटरमध्ये जिल्हा कायदा सेवा प्राधिकार, कर्नाटक उच्च न्यायालयाची कायदा सेवा समिती आणि सर्वोच्च न्यायालयाची कायदा सेवा समिती यांच्याकडून मोफत कायदा सेवा मिळण्यासंदर्भातही मार्गदर्शन केले जाणार आहे.