बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिकेच्या महसूल खात्याच्या बैठकीत वरिष्ठांनी घेतलेल्या झाडाझडतीमुळे मानसिकता ताण येऊन एका अधिकाऱ्याला उभ्या उभ्याच भोवळ आल्याची आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव महापालिकेमध्ये आज सकाळी उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल खात्याची बैठक बोलवण्यात आली होती. शहरातून गोळा केल्या जाणाऱ्या महसुलाची सद्यस्थिती, महसूल गोळा करण्यात होणारी दिरंगाई तसेच महसूल वाढीसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येत होती.
यावेळी उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी महसूल वसुली संदर्भात उपस्थित महसूल अधिकारी श्रीकांत इराले यांना धारेवर धरून त्यांची झाडाझडती घेतली.
त्यावेळी भांबावून गेलेले श्रीकांत उपायुक्तांना उत्तर देत असताना अचानक उभ्या उभ्या आपल्या आसनावर कोसळले. रक्तदाब वाढवून भोवळ येण्याद्वारे त्यांची प्रकृती अचानक खालावली. या प्रकारामुळे बैठकीला उपस्थितीत सर्वांना धक्का बसून एकच धावपळ उडाली.
त्यानंतर प्रसंगावधान राखून महसूल अधिकारी श्रीकांत इराले यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बैठकीच्या ठिकाणीच महसूल अधिकारी चक्कर येऊन पडण्याची सदर घटना सध्या महापालिकेत चर्चेचा विषय झाली आहे.