श्री गणेश विसर्जन मिरवणुकीतील सहभागी गणेश भक्त व पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी गटारीवर घालण्यात आलेल्या फरशा मिरवणूक संपण्याचीही वाट न पाहता घिसाड घाईने पुन्हा काढून घेण्यात आल्याचा निषेधार्ह आणि महापालिका प्रशासनाला लाजवणारा प्रकार आज शुक्रवारी रामदेव गल्ली येथे घडला. तसेच हा प्रकार म्हणजे महापालिकेकडून सुविधा देण्याच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात केली जाणारी धुळफेक असल्याचा आरोप केला जात असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
श्री गणेशोत्सवापूर्वी हा उत्सव मोठ्या प्रमाणात सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने महापालिकेत जिल्हा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारीची बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सवासाठी सरकारकडून 1 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते. हा निधी गणेशोत्सव काळात कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, गैरसोय होऊ नये या दृष्टीने चांगले रस्ते, पथदीप, फ्लड लाइट्स, विसर्जन तलावाची स्वच्छता रंग-रंगोटी वगैरे सुविधांवर खर्च केला जाणार होता.
पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष करून जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या होत्या. त्यावेळी आणि त्यानंतरही कलघटगी यांनी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असलेल्या रामदेव गल्लीतील उघड्या गटारींची समस्या सातत्याने मांडून तिच्या निवारणासाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश येऊन विसर्जन मिरवणुकी प्रसंगी धोकादायक ठरू शकणाऱ्या त्या उघड्या गटारी फरशा घालून सुरक्षित बंद करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह नगरसेवकांच्या ताफ्याने रामदेव गल्लीसह मिरवणूक मार्गाची पाहणीही केली होती. उघड्या गटारींवर फरशा घालण्यात आल्यामुळे पादचाऱ्यांसह रामदेव गल्लीतील व्यापारी दुकानदारांमध्ये समाधान व्यक्त होत होते.
मात्र त्यांचे हे समाधान फार काळ टिकू शकले नाही. कारण 24 तासही झाले नाहीत तोवर गटारीवर घालण्यात आलेल्या त्या फरशा श्री गणेश विसर्जन मिरवणूक समाप्त होण्यापूर्वीच आज दुपारी पुन्हा काढून टाकण्यात आल्या.
एका हौदारिक्षासह रामदेव गल्लीत दाखल झालेल्या कामगारांनी आज दुपारी दोन्ही बाजूच्या खुल्या गटारीच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या फरशा फटाफट काढून रिक्षामध्ये भरण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथील दुकानदार व व्यापाऱ्यांमध्ये सखेद आश्चर्य होत होते. सदर प्रकाराची माहिती एका जागरूक व्यापाऱ्याने तात्काळ गणेश महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांच्या कानावर घातली. तेंव्हा कलघटगी यांनी लागलीच महापालिका आयुक्तांशी संपर्क साधला असता गटारीवरील फरशा काढण्याच्या प्रकाराची आपल्याला कांहीच कल्पना नाही. आपण चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
दरम्यान, जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांच्याच पैशातून मुख्य बाजारपेठ असलेल्या रामदेव गल्लीतील खुल्या गटारीच्या ठिकाणी नुकत्याच घालण्यात आलेल्या फरशा पुन्हा घिसाड घाईने काढून नेण्याच्या या प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्याचप्रमाणे आपण शहरवासीयांना किती चांगल्या सुविधा पुरवत आहोत या अविर्भावात महापौरांसह नगरसेवकांनी केलेला विसर्जन मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा म्हणजे निव्वळ फार्स असल्याचे बोलले जात आहे. श्री गणेशोत्सवासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर झाला असताना गटारीवर घातलेल्या फरशा पुन्हा काढून घेण्याचा महापालिकेकडून केला गेलेला हा प्रकार अतिशय लाजिरवाणा असून महापालिकेला भिकेचे डोहाळे तर लागले नाहीत ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. तसेच श्री गणेशोत्सवासाठी मंजूर झालेल्या निधीतून जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करून अधिकारी, कंत्राटदार व लोकप्रतिनिधी आपली तुबडी भरून घेत आहेत का? असा संतप्त सवालही केला जात आहे. आता कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी याबाबतीत कोणती कार्यवाही करतात? याकडे रामदेव गल्लीतील दुकानदार व्यापारी आणि जागरूक नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.