बेळगाव लाईव्ह :शेरी गल्ली कॉर्नरवर रामलिंग खिंड गल्ली येथील हॉटेल राजमहल शेजारी रोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. शहरातील अशी ठिकाणे म्हणजे ब्लॅक स्पॉट हटवण्याचा निर्णय बेळगाव महापालिका आयुक्तांनी घेतला असताना हा ब्लॅक स्पॉट अद्याप तसाच का? असा सवाल केला जात आहे.
शेरी गल्ली कॉर्नरवर रामलिंग खिंड गल्ली येथील हॉटेल राजमहल शेजारी रोज मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेला कचरा व अन्य टाकाऊ साहित्य फेकले जात आहे. घाण व कचऱ्याच्या ढिगार्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर नेहमी घाण अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली असते.
रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना विशेष करून पादचाऱ्यांना येथून जाताना नाक मोठी धरून जावे लागते. सदर घाण केरकचऱ्यामुळे आसपासच्या नागरिकांच्या विशेष करून लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
अलीकडेच स्थानिक नगरसेवक आणि जागरूक नागरिकांनी महापालिकेच्या सहकार्याने या ठिकाणच्या हेमू कलानी चौकात रस्त्याशेजारी सूचना फलक उभारून कचरा टाकण्यावर निर्बंध घातला होता.
मात्र आता तेथून कांही अंतरावर असलेल्या शेरी गल्ली कॉर्नर जवळ मोठ्या प्रमाणात कचरा टाकून अस्वच्छता पसरविली जात असल्यामुळे स्वच्छता प्रेमी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
त्याचप्रमाणे शहर स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मनपा आयुक्त अशोक दूडगुंटी यांचे या कचऱ्याच्या ढिगार्याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल सखेत आश्चर्य व्यक्त होत आहे.
तेंव्हा संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन हा ‘ब्लॅक स्पॉट’ तात्काळ हटवावा अशी मागणी केली जात आहे.