बेळगाव लाईव्ह: येळळूर गावच्या वेशीवर असलेला महाराष्ट्र राज्य फलक प्रकरणी कोर्टातील याचिकेत सोमवारी मोठी अपडेट समोर आली आहे. या खटल्यात ए सी पी एन व्ही बरमणींसह पाच जणांची साक्ष वगळली आहे.येळ्ळूर महाराष्ट्र राज्य खटला प्रकरणी त्यांची साक्ष होती गेल्या सात वर्षांपासून एकाही सुनावणीला हजेरी नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवल्यानंतर निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीत मराठी लोकांवर अमानुष मारहाण करण्यात आला होता त्यानंतर स्थानिक लोकांवरच गुन्हे नोंदवण्यात आले. पण, या खटल्यात फिर्यादी असलेले एसीपी नारायण बरमणी यांच्यासह चौघे साक्षीदार आणि पंच एकाही सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने पाचही जणांची नावे खटल्यातून वगळण्याचे आदेश बजावले आहे.
2014 साली येळ्ळूर वेशीतील महाराष्ट्र राज्य फलक हटवण्यात आला. त्याला विरोध म्हणून ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. पण, पोलिसांनी घराघरात घुसून शेकडो लोकांना मारहाण केली. या अमानुष मारहाणीतून जनावरेही सुटली नाही. लोकांवर गुन्हे नोंदवण्यात आले.19 आगॅस्ट 2016 पासून या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
पण, या खटल्याचे फिर्यादी असलेले एसीपी नारायण बरमणी यांच्यासह दोन साक्षीदार आणि दोन पंच एकाही सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यांना वारंवार नोटीसा बजावूनही उपस्थित राहत असल्यामुळे अॅड. शामसुंदर पत्तार यांनी आक्रमकपणे बाजू मांडली. त्यामुळे न्यायाधिशांनी या पाचही जणांची साक्ष वगळण्याचा आदेश बजावला.
न्यायालयाच्या आदेशामुळे येळ्ळूरच्या जनतेची बाजू बळकट झाली असून लवकरच या याचिकेवर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. येळ्ळूरच्या जनतेच्या वतीने अॅड. पत्तार यांच्यासह अॅड. शाम पाटील आणि अॅड. हेमराज बेंचण्णावर हे काम पाहात आहेत.या बहुचर्चित खटल्याची पुढील सुनावणी 17 ऑक्टोबर रोजी जे एम एफ सी द्वितीय कोर्टात होणार आहे त्या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पंकजा कोन्नुर या न्यायाधीश यांच्यापुढे ही सुनावणी झाली आहे.