बेळगाव लाईव्ह :बेळगांवातील टेक समुदायाला ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता एकत्र आणण्यासाठी बेलगावी टेक्नॉलॉजी कंपनीज असोसिएशन (बीईटीसीए)तर्फे आयोजित ‘बीईटीसीए टेक मीट -अप 2.0’ हा मेळावा आज शुक्रवारी सायंकाळी उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला.
बेळगाव प्रेसिडेन्सी क्लब येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव मधील माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि आयटी आधारित सेवेमध्ये (आयटीइएस) तज्ञ असलेल्या विविध कंपन्यांना एकत्र येण्यासाठी, त्यांचे कौशल्य उपलब्ध करण्यासाठी आणि सहयोगाच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून देखील या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या भागातील टेक इकोसिस्टमच्या वाढीस प्रोत्साहन देणे आणि नवकल्पना वाढवणे हे आहे हा या मेळाव्याचा आणखी एक उद्देश होता. सदर मेळाव्यात सांख्या लॅबचे सीईओ पराग नाईक, 5जी आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन्समधील प्रणेते तसेच डूसिलेक्टचे संस्थापक (इन्फोएज लिमिटेडने अधिग्रहित केलेले) इलियास शिरोळ यांनी सतत विकसित होत असलेल्या टेक क्षेत्राबद्दल मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
बेळगांव मधील तंत्रज्ञान क्षेत्राला विकसित करण्यासाठी समर्पित असलेल्या बीईटीसीए या संस्थेचे अधिकृत लाँच हे या मेळाव्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. या मेळाव्यामध्ये बेळगावमधील स्टार्टअप्सना समर्थन आणि त्यांच्या विकासात हातभार लावण्यास उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांची ओळख करून देण्यात आली. त्यांचा सहभाग स्टार्टअपना त्यांच्या यशासाठी आवश्यक साधन सामग्री आणि मार्गदर्शन प्रदान करण्यास अनुकूल ठरणार आहे.
‘बीईटीसीए टेक मीट -अप 2.0’ मिळाव्याद्वारे 300 हून अधिक उत्साही तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञाच्या विविध क्षेत्रातील व्यावसायिकांच्या उपस्थितीत नेटवर्किंग आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी गतिशील वातावरण तयार करण्यात आले.
मेळाव्यात सहभागी झालेल्यांना उद्योगात जोडण्याची, नवनव्या कल्पना व्यक्त करण्याची आणि मौल्यवान अशा नव्या ओळखी निर्माण करण्याची संधी मिळवून देण्यात आली. शेवटी बीईटीसीए टेक मीट -अप 2.0 यशस्वी केल्याबद्दल सर्व वक्त्यांचे सर्व प्रायोजक आणि हितचिंतकांचे बीईटीसीएने आभार मानले. तसेच बीईटीसीए आणि भविष्यातील कार्यक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी https://techmeet. betca.org/ या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बेळगाव टेक्नॉलॉजी कंपनीज असोसिएशन (बीईटीसीए) म्हणजे बेळगांव मधील टेक कंपन्यांचा एक समूह आहे. जो स्थानिक टेक इकोसिस्टममध्ये नावीन्य, सहयोग आणि वाढीला चालना देण्यासाठी समर्पित आहे. बीईटीसीए ज्ञानाची देवाणघेवाण, नेटवर्किंग आणि उद्योग विकासासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्याचा प्रयत्न करते.