बेळगाव लाईव्ह :यंदाचा एलिव्हेट कर्नाटक -2023 पुरस्कार जिंकल्याबद्दल बेळगाव येथील मोटोक्रॉस इंडिया या टीपीआयआयटी मान्यता प्राप्त कंपनीला ती करत असलेल्या नाविन्यपूर्ण कामासाठी कर्नाटक सरकारकडून अनुदान प्राप्त झाले आहे.
भारतामध्ये स्थानिक दुचाकी वाहनांच्या गॅरेजीसची सर्वात मोठी साखळी बनविणे हे मोटोक्रॉस इंडिया कंपनीचे ध्येय आहे. सरकारच्या अनुदानाच्या कार्यक्रमात जवळपास 1700 हून अधिक स्टार्टप्सनी सहभाग दर्शवला होता. ज्यामध्ये मोटोक्रॉस इंडियासह 100 पेक्षा कमी स्टार्टप्स अनुदान मिळवण्यात यशस्वी झाल्या. या संदर्भात बोलताना मोटोक्रॉस इंडियाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी करण जवळी यांनी मागील वर्षी आमच्या कंपनीने बेळगाव जिल्ह्यातील 275 गॅरेजीस बरोबर भागीदारी करत वार्षिक 1 कोटीहून अधिक उलाढाल केली होती. आता यंदा यावर्षी ही उलाढाल किमान 3 कोटी रुपयांपर्यंत वाढविणे हे कंपनीचे लक्ष्य आहे, असे स्पष्ट केले.
जवळी यांचे मूव्ह ऑन व्हील्स – दुचाकी भाड्याने देणारी कंपनी, क्लब सेव्हन – क्लबिंग प्लॅटफॉर्म, बीजे इंडस्ट्रीज – मशीन वर्कशॉप आणि मोटोक्रॉस इंडिया असे चार उपक्रम आहेत. त्याचप्रमाणे करण जवळी हे उत्तर कर्नाटकातील एकमेव संस्थापक आहेत, ज्यांनी शार्क टॅंक इंडियाच्या पहिल्या सत्रात हजेरी लावण्याचा मान मिळवला आहे.
केएएसएसआयए बेंगलोरचा 2021 मधील कर्नाटकातील सर्वोत्तम एसएमई पुरस्कार पटकाविणाऱ्या जवळी यांना 2019 मध्ये राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाले आहे. याचबरोबर स्केटिंगमध्ये तरबेज असलेल्या करण जवळी यांच्या नावावर स्केटिंग मधील विश्व विक्रमाचीही नोंद आहे.