बेळगाव लाईव्ह:वाळलेली पिके हातात घेऊन निदर्शने करण्याद्वारे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांप्रमाणे बेळगाव आणि खानापूर तालुका देखील तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि नेगील योगी रयत सेवा संघाने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कर्नाटक राज्य रयत संघ आणि नेगील योगी रयत सेवा संघातर्फे आज सोमवारी सकाळी निदर्शने करत मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वरील मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
यावेळी बेळगाव व खानापूर तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित केला जावा यासाठी शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी हातात भात वगैरे वाळलेली पिके घेऊन केलेली निदर्शने साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना शहरातील धडाडीचे नेते प्रगतशील शेतकरी रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव व खानापूर वगळता इतर सर्व तालुके सरकारने दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. सदर प्रकार या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठी जाणून-बुजून केल्यासारखे वाटते. जिल्ह्यात सरसकट सर्वत्र कमी पाऊस झाला असताना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधून बेळगाव व खानापूर तालुक्यांना वगळण्याचा, सरकारची दिशाभूल करण्याचा अधिकार संबंधित कृषी अधिकाऱ्यांना कोणी दिला? तेंव्हा माझी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की त्यांनी हे दोन्ही तालुके देखील तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावेत असे सांगून त्याचप्रमाणे लंपी सारख्या रोगाचाही प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे जनावरांना आवश्यक ते लसीकरण युद्धपातळीवर सुरू करावे आणि शेतकऱ्यांना त्वरेने दुष्काळी अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कोंडुसकर यांनी केली.
रयत संघटनेचे बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना तीन-चार महिन्यापूर्वी सुरू झालेल्या यंदाच्या खरीप हंगामात अतिशय कमी पाऊस झाला आहे. यावर्षी जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये हजेरी लावली. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने शेतीच्या दृष्टीने कोरडे गेले. त्यामुळे भात पिकाची वाढ व्हावी तितकी झाली नसून भाताचे दाणे देखील धरलेले नाहीत. बेळगाव व खानापूर तालुक्यात 80 टक्के भात पीक घेतले जाते. पाऊस नसल्यामुळे या पिकाबरोबरच रताळी, सोयाबीन, भुईमूग, ऊस आणि आता बटाटे पिकाचे नुकसान झाले आहे.
बटाटे पिकाची परिस्थिती तर अशी आहे की ते जमिनीतच खराब होत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 13 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले, उर्वरित बेळगाव व खानापूर तालुके कोणत्या आधारावर दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले नाहीत? खरं सांगायचे तर कृषी अधिकाऱ्यांनी या तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण केलेलेच नाही. फक्त आपल्या एसी ऑफिसमध्ये बसून तयार केलेला सर्वेक्षणाचा अहवाल त्यांनी सरकारला दिला आहे. केंव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन बेळगाव व खानापूर तालुका लवकरात लवकर दुष्काळग्रस्त जाहीर करावा अन्यथा येथील शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असे मरवे यांनी स्पष्ट केले.
याखेरीज लंपी स्कीन रोगामुळे शेतकऱ्यांची जनावरे आजारी पडत आहेत. याकडेही सरकारने लक्ष देऊन आवश्यक रोगप्रतिबंधक लसीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्याचे आदेश द्यावेत. शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन जनावरांवर उपचार केले जावेत. आमच्या या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट होणार आहे आणि त्याला सरकार जबाबदार राहील. तेंव्हा सरकारने आमचे तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याबरोबरच लंपी प्रतिबंधक लसीकरण सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे शेतकरी नेते राजू मरवे शेवटी म्हणाले.