Saturday, December 21, 2024

/

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ 8 रोजी आंदोलन -ॲड. बेनके

 belgaum

बेळगाव लाईव्ह:राज्यातील विद्यमान काँग्रेस सरकारने संपूर्ण राज्यभरात शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्याच्या निषेधार्थ कर्नाटक भारतीय जनता पक्ष व रयत मोर्चातर्फे येत्या शुक्रवार दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी प्रत्येक तालुका केंद्राच्या ठिकाणी मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.

शहरात आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर रयत मोर्चाच्या राज्य व जिल्हाध्यक्षांसह माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते. राज्य सरकारने संपूर्ण राज्यात शेतकरी विरोधी धोरण अवलंबले आहे. त्याच्या निषेधार्थ येत्या 8 सप्टेंबर रोजी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार कार्यालय समोर आंदोलन छेडले जाईल. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात भव्य मोर्चा काढून निदर्शने केली जातील.

मागील सरकारने अंमलात आणलेल्या शेतकरी तसेच जनहितार्थ असलेल्या योजना व कायदे विद्यमान सरकारने रद्द केले आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे सत्र राज्य सरकारने सुरू केल्यामुळे त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आणि किसान अर्थात रयत मोर्चातर्फे 8 रोजी आंदोलन छेडले जाईल, असे माजी आमदार ॲड. बेनके यांनी पुढे सांगितले.

यावेळी रयत मोर्चाच्या अध्यक्षांनी विविध हितकारी योजना तडकाफडकी मागे घेण्याच्या राज्य सरकारच्या कृतीमुळे निर्माण झालेल्या समस्यांची आणि आपल्या मागण्यांची माहिती दिली. पावसाअभावी सध्या दुष्काळाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर समस्येच्या निवारणासाठी राज्य सरकारने युद्ध पातळीवर क्रम घ्यावेत. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना अनियमित वीज पुरवठा केला जात आहे. त्याचा परिणाम पिकावर होत असल्यामुळे हे लोड शेडिंग बंद करून पंप सेटना सलग 7 तास वीज पुरवठा केला जावा. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात सुमारे 42 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे खेदाने नमूद करावे लागते.

या संदर्भात तात्काळ पाऊल उचलून सरकारने शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्याबरोबरच त्यांचे आर्थिक सशक्तिकरण करावे असे सांगून आपल्या अन्य मागण्यांची माहिती उपस्थित शेतकरी नेत्यांनी दिली. तसेच अन्नदात्या शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्याऐवजी राज्यातील काँग्रेस सरकार आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे, याबद्दल त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.