बेळगाव लाईव्ह :दहा -पंधरा वर्षांपूर्वी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्याची सोय उपलब्ध झाल्यानंतर फोटोग्राफी व्यवसायाचे काय होणार? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र फोटो आणि व्हिडिओग्राफीचे महत्व आजही आहे आणि पुढे देखील कायम राहणार आहे. जग कितीही प्रगत झाले तरी फोटोग्राफी व्यवसायाचा लय कधीही होणार नाही, असे विचार माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी व्यक्त केले.
बेळगाव शहर आणि तालुका फोटो /व्हिडिओ ग्राफर्स संघटनेतर्फे (बीसीटीपीएल) आज शुक्रवारी गणेशपुर रोड कॅम्प बेळगाव येथील शानभाग हॉल येथे जागतिक छायाचित्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक या नात्याने आमदार बेनके बोलत होते. याप्रसंगी डॉ. जगत, ज्येष्ठ छायाचित्रकार सुभाष ओऊळकर, राजा कट्टी, हॉटेल व्यावसायिक अजित शानभाग आदीसह बेळगाव शहर आणि तालुका फोटो /व्हिडिओ ग्राफर्स संघटनेचे अध्यक्ष डी. बी. पाटील सेक्रेटरी संजय हिशोबकर व खजिनदार नितीन महाले व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात आमदार बेनके म्हणाले की, अलीकडच्या काळात फोटो व व्हिडिओ ग्राफरचे महत्व खूप वाढले आहे. कार्यक्रम उशिरा सुरू झाला तरी चालेल प्रथम फोटोग्राफर हवा असे आज कालच्या आयोजकांचे मत असते. प्रमुख पाहुणे वगैरे देखील फोटो व व्हिडिओग्राफर आलेत का? असे विचारून कार्यक्रमाला हजेरी लावतात. मोठ्या सभा-समारंभाना हजारो लोक उपस्थित असले तरी फोटोग्राफर समोर दिसत नाही तोपर्यंत नेतेमंडळी भाषणासाठी उठत नाहीत ही अतिशयोक्ती नाही तर वस्तुस्थिती आहे. आज-काल फोटो व व्हिडिओग्राफर शिवाय समाजातील कोणताही कार्यक्रम होऊच शकत नाही.
एखादा फोटोग्राफर आपल्या फोटोग्राफीमुळे कसे परिवर्तन घडवून आणू शकतो याची माहिती देताना त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील उपासमारीचे भीषण सत्य दाखवणाऱ्या कुपोषित मुली शेजारी बसलेल्या गिधाडाच्या जगप्रसिद्ध छायाचित्राचे उदाहरण दिले. संबंधित फोटोग्राफरच्या त्या एका फोटोमुळे साऱ्या जगाचे लक्ष दक्षिण आफ्रिकेकडे वेधले गेले आणि त्या ठिकाणी मदतीचा ओघ सुरू झाला. त्यामुळे जग कितीही प्रगत झाले तरी फोटोग्राफी कधीही नामशेष होणार नाही, असे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फोटो आणि व्हिडिओग्राफी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर स्वागत गीत व इशस्तवनाने मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. संघटनेचे अध्यक्ष डी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक भाषण केल्यानंतर प्रमुख पाहुणे माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते कॅमेरा क्लिक करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त यावेळी प्रमुख पाहुण्यांसह ज्येष्ठ फोटो व व्हिडिओग्राफर्सचा शाल, फळे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नामदेव कोळेकर, सुरेश राजाई, बाळू सांगूकर, महादेव कंग्राळकर, संतोष पाटील, दीपक वांद्रे डी. डी. दिवटे आदींसह संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, निमंत्रित आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त शहर व तालुक्यातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर्ससाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वेनुग्राम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रक्तदाब आणि मधुमेह तसेच विजया हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हाडांच्या ठिसूळतेची तपासणी व मार्गदर्शन केले. आजच्या या सोहळ्यासह प्रदर्शनामध्ये सुभाष फोटोज, शिवनेरी डिजिटल वर्ल्ड, युनिक फोटोज, सद्गुरु फ्रेम्स अँड फोटो लॅब, फोटो स्क्वेअर, कदम फोटो ग्रुप, पद्मश्री कलर लॅब, कनक आर्ट्स आणि सह्याद्री लेड वॉल्स यांचा सहभाग होता.