इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे येळ्ळूर रोड येथील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटल येथे जागतिक स्तनपान सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला.
इनर व्हील क्लब ऑफ बेळगावच्या अध्यक्षा मंजिरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून प्रा डॉ. सोनाली बिज्जरगी आणि डॉ. गीतांजली तोटगी उपस्थित होत्या. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रस्ताविक झाल्यानंतर डॉ. बिज्जरगी यांनी आपल्या व्याख्यानात नोकरदार मातांनी स्तनपानाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे डॉ. तोटगी यांनी स्तनपान कसे करावे याबद्दल माहिती दिली. या उभय वक्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मातांनी आपल्या बाळाला स्तनपान देण्याचे टाळू नये असे आवर्जून सांगितले. सदर कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. एच. बी. राजशेखर यांनी मातेच्या दुधा इतके बाळांसाठी पोषक कोणतेही अन्न नाही असे स्पष्ट केले.
अध्यक्ष व केएलई चॅरिटेबल ट्रस्टचे वैद्यकीय संचालक डाॅ. एस. सी. धारवाड यांनी राज्यामध्ये स्तनपानाविषयी सतत जागृती करण्यात येत असल्याने बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट केले.
स्तनपान सप्ताह निमित्त इनरव्हील क्लबतर्फे केएलई चॅरिटेबल हॉस्पिटल मधील नवजात शिशूंच्या मातांना खजूर, प्रोटीन पावडर आणि त्यांच्या बाळांसाठी कपड्यांचे वाटप करण्यात आले. हॉस्पिटलमधील एकूण 50 मातांना हे साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मंजिरी पाटील यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
याप्रसंगी इव्हेंट चेअरमन डॉ. रचना शानभाग, विना शहा, गीता पोतदार, रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर, डॉ. सतीश धामणकर, तुषार पाटील आदी उपस्थित होते. शेवटी योगिनी नाईक यांनी सर्वांचे आभार मानले.