बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या आणि राजकारणावर प्रभाव असणाऱ्या काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे काय होणार याचे त्रांगडे अद्याप सुटलेले नसून बुधवारी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी सत्ताधारी गटाकडून पॅनेल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा एकच पॅनेलच्या हालचाली असून याबाबत बुधवारी (दि. 23) चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी 27 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. कारखान्याच्या पंधरा जागांसाठी 55 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 14 जणांनी अर्ज मागे घेतले असून परस्पर संमतीने निवडणुकीतून माघारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
या निवडणुकीत सत्ताधारी गटात काही बदल करण्यावरून गेल्या काही दिवसांपासून घमासान सुरू आहे. अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचे वेगवेगळे पॅनेल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, आता सत्ताधारी गट पॅनेल तयार करण्यासाठी पुढे सरसावले आहे. त्यानुसार दोन्ही बाजुंनी उमेदवार निवडण्यात येत आहेत.
सत्ताधारी गटाच्या पॅनेलवर बुधवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरीत उमेदवार कोणता निर्णय घेणार, याकडेही सदस्यांचे लक्ष लागून आहे. पॅनेल करून इतर उमेदवारांना माघार घेण्यासाठी मनधरणी करण्यात येणार आहे.
त्यामध्ये पॅनेलला किती यश मिळते, हे पाहावे लागणार आहे. निवडणुकीत सुमारे 3 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
वास्तविक पाहिल्यास 21रोजी अर्ज माघारीची मुदत संपली आहे मात्र निवडणूक अधिकाऱ्याच्या सहकार्याने निवडणूक टाळण्यासाठी अद्याप प्रयत्न केले जात आहेत.