पावसाने उघडीत दिल्यामुळे बेळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयातील पाण्याची आवक सध्या घटली आहे. त्यामुळे राकसकोप जलाशयाचे दोन्ही दरवाजे गेल्या पाच दिवसापासून बंद करण्यात आले आहेत.
यंदा राकेसकोप जलाशय जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तुडुंब भरले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जुलैमध्ये जलाशयाचे दरवाजे दोन वेळा खुले करण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत दरवाजे बंद असून जलाशयात सध्या 2475.40 फूट पाणी साठा आहे.
जलाशय परिसरात आतापर्यंत 1480.1 मि. मी. इतका पाऊस पडला आहे. दरम्यान, हिडकल जलाशय भरण्यास अद्यापही 7.522 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. हिडकल जलाशयाची पाणीसाठा क्षमता 51 टीएमसी असून सध्या या जलाशयात 43.478 टीएमसी पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत या जलाशयात 2776 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
गतवर्षीही आवक 8028 क्युसेक्स इतकी होती. पाऊस गायब झाल्यामुळे यंदा हे जलाशय तुडुंब भरण्याची शक्यता धुसर बनली आहे. बेळगाव शहराला हिडकल व राकसकोप जलाशयातून पाणीपुरवठा होत असल्यामुळे ही दोन्ही जलाशय तुडुंब भरणे गरजेचे आहे.
दरवर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस पडतो. मात्र यंदा अद्याप असे न घडल्यामुळे लोकांच्या नजरा पुन्हा आभाळाकडे लागून राहिल्या आहेत.