बेळगाव लाईव्ह :पणजी मार्गावरील कणकुंबीजवळ ट्रक रस्त्याच्या मध्ये बंद पडल्यामुळे दुपारी 2 वाजल्यापासून दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडकून पडली आहेत. या चक्काजामुळे लोकांचे मोठे हाल झाले आहेत.
बेळगाव पणजी महामार्गाची अक्षरशः धूळधाण उडाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून तिथून वाहन चालवणे म्हणजे तारेवरची कसरत बनली आहे.
गुरुवारी दुपारी या रस्त्याच्या मधोमध मालवाहू ट्रक बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूला शेकडो वाहने थांबून आहेत. दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामध्ये अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.
कणकुंबी जवळ पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या मधोमध ट्रक बंद पडला. त्याच्या मागोमाग कर्नाटक आणि गोव्याच्या परिवहन बसेस अडकून आहेत तर खासगी कार गाड्या आणि इतर वाहनांनाही जागा मिळत नाही. या वाहनात महिला आणि मुलेही असून त्यांना खायला, प्यायला काहीही मिळत नाही त्यामुळे त्यांचे मोठे हाल होत आहेत.
मोबाईलाही नेटवर्क नसल्यामुळे कोणाशीही संपर्क होत नाही. रात्री आठ नंतर वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू झाले असून लहान आकाराच्या कारची ये-जा सुरू झाली आहे. पण पूर्ण वाहतूक कोंडी केव्हा मोकळी होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे.