बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेल्या मार्कंडेय कारखान्यासाठी निवडणूकीचा जोर सुरू झाला आहे. सध्या कार्यरत असलेले जुनेच संचालक मंडळ पुन्हा नियुक्त होणार की नवीन काही जणांना संधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
उमेदवारीसाठी शनिवारी शेवटचा दिवस आहे त्यानंतर सदर निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला वेग आला आहे. शनिवारी (दि. 19) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. यासाठी तालुक्यातील सर्व इच्छुकात, शेअर होल्डर सदस्यांत जोरदार घडामोडी वाढल्या आहेत.
निवडणुकीत आत्तापर्यंत 31 जण उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे यावेळी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पाच वर्षासाठी संचालक म्हणून निवडून येण्यासाठी अनेकांकडून लॉबिंग करण्यात आली आहे. 27 ऑगस्ट रोजी या कारखान्यासाठी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवार हा शेवटचा दिवस असून शनिवारी दुपारी नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितनुसार काही जेष्ठ संचालकांच्या मते जुनेच संचालक मंडळ कार्यरत रहावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत तर कारखान्याचा विकास करण्यासाठी जुन्या आणि नव्या संचालकांचा मेळ चांगला राहील, असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे ही निवडणूक कशी होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागून आहे.
एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यामध्ये ऊस उत्पादक सदस्यांतून 13 सदस्य आणि संस्था गटातून एक आणि बिनऊस उत्पादक संघातून एका सदस्याची निवड होणार आहे.
शनिवारी दुपारनंतर मार्कंडे साखर कारखान्याची निवडणूक होणार की बिनविरोध होणार हे चित्र स्पष्ट होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.