बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील कोकणात कृषी पर्यटन चालू आहे विद्यार्थी आणि नागरिकांना ज्यांची शेती नाही अश्याना शेतीची माहिती मिळावी यासाठी कृषी पर्यटन सुरू करण्यात आले आहे. अलीकडच्या बेळगावात देखील विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व आणि माहिती देण्याकरिता अनेकांनी शेती पर्यटन करवले आहे.त्याचाच एक भाग म्हणून जायंटस या संस्थेने शालेय विद्यार्थिनींना शेतीचे महत्व आणि शेतकऱ्यांचे कष्ट कळावेत या उद्देशाने त्यांच्याकडून प्रत्यक्ष भात रोप लागवड करून घेण्याचा स्तुत्य उपक्रम आज सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.
अलीकडच्या आधुनिक युगात पारंपरिक शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. याची दखल घेऊन जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने आज सोमवारी सकाळी न्यू गर्ल्स हायस्कूल गोवावेस शहापूरच्या सहकार्याने एक स्तुत्य उपक्रम राबवला. त्यांनी शेतकरी महादेव मायप्पा गुंडूचे यांच्या शेतात शालेय विद्यार्थिनींना भाताची नटी लावणे, भात रोप लागवड, मशागतीच्या पारंपरिक पद्धतीचे प्रत्यक्ष ज्ञान दिले. सदर उपक्रमात न्यू गर्ल्स हायस्कूलच्या 70 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवत आनंदी वातावरणात भाताची रोप लागवड केली.
जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष सुनील मारुती मुतगेकर व अन्य एका पदाधिकाऱ्याने सदर उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल शेतकरी महादेव गुंडूचे आणि न्यू गर्ल्स स्कूलचे मुख्याध्यापक जे. यु. घाडी यांना धन्यवाद दिले. शालेय मुलांना पारंपारिक शेती आणि शेतकरी घेत असलेल्या कष्टाचे महत्व कळावे या उद्देशाने, तसेच बऱ्याचदा मुले अन्नाची नासाडी करतात त्यांनी यापुढे तसे न करता शेतकऱ्याने त्या अन्नाच्या उत्पादनासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवावी या सुप्त हेतूने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे अध्यक्ष सुनील मुतगेकर यांनी स्पष्ट केले.
शेतकरी महादेव गुंडूचे यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना या भावी पिढीला पारंपारिक शेतीचे प्रशिक्षण देण्याचा हा उपक्रम पाहून आपल्याला आनंद झाल्याचे सांगितले. या पद्धतीने मुलांनी कष्ट करण्यास शिकले पाहिजे आणि शेतीची पारंपारिक पद्धत टिकवली पाहिजे असेही ते म्हणाले. मुख्याध्यापक जे. यु. घाडी यांनी विद्यार्थिनांना खुल्या आनंदी वातावरणात नट्टी लावणे, भात रोप लागवड, मशागत यांचा प्रत्यक्ष अनुभव व ज्ञान मिळवून दिल्याबद्दल जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे आभार मानले.
याप्रसंगी जायंट्स सेक्रेटरी लक्ष्मण शिंदे, खजिनदार विजय बनसुर, शिवकुमार हिरेमठ, अनंत कुलकर्णी, अनिल चौगुले आदींसह अन्य सदस्य उपस्थित होते.