बेळगाव लाईव्ह :कर्नाटकात ‘ऑपरेशन कमळ’ला परतावून लावण्यासाठी ‘ऑपरेशन हस्त’ सुरू झाले असून त्या अंतर्गत भाजप आणि निजदचे 20 आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, अशी स्फोटक माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काल चामराजनगर येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
मंत्री जारकीहोळी म्हणाले की, ऑपरेशन हस्तद्वारे काहींची घरवापसी होण्याची शक्यता आहे. आमदार रमेश जारकीहोळी यांच्या संदर्भात आपल्याला कांही कल्पना नाही. मात्र उघडपणे 20 आमदार काँग्रेसच्या संपर्कामध्ये आहेत. त्यामुळे ‘ऑपरेशन हस्त’ सुरू झाले हे खरे आहे.
काँग्रेसच्या संपर्कात असलेल्यांपैकी एका पक्षाचे (भाजप) 10 आणि आणखी एका पक्षाचे (निजद) 10 असे एकूण 20 आमदार संपर्कात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी आपल्या बेळगाव दौऱ्याप्रसंगी भाजपमधील आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.
तसेच पक्षाची तत्वे, सिद्धांत मान्य करून येणाऱ्यांचे स्वागत करण्यात येईल, अशी माहितीही दिली होती. त्यानंतर आता काल बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी यासंदर्भातील स्फोटक माहिती देऊन ‘ऑपरेशन हस्त’ला दुजोरा दिला आहे.
यामुळे बेळगाव जिल्ह्यासह राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.