सरोळी (ता.चंदगड)सारख्या एका छोट्याशा गावातील तरुणाची तेलगू टायटन्सच्या संघामध्ये निवड झाल्याने सरोळीसह चंदगड तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. येथील ग्रामस्थातून, कबड्डी खेळाडूंकडून व कबड्डी प्रेमीकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.सुरज देसाई, सिद्धार्थ देसाई नंतर चंदगड तालुक्यातून प्रो कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेला हा तिसरा खेळाडू आहे. हैद्राबाद येथे झालेल्या निवड चाचणीत त्याची निवड झाली. तेलगू टायटन्सने आपल्या संघामध्ये त्याला संधी दिली आहे.
19 वर्ष्याच्या या नवोदित खेळाडूने आपल्या आक्रमक, चपळ, तंत्रशुद्ध आणि अष्टपैलू खेळाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. 6 फूट उंच असलेल्या ओमकार पाटीलने आपल्या शैलीदार खेळाने कबड्डी प्रेमीना सुखद धक्का दिला आहे. रावज अकॅडमी कोल्हापूर येथे प्रशिक्षक डॉ. श्री. रमेश भेंडिगिरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ओमकार पाटील प्रो कबड्डीच्या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
आक्रमकता, चपळता,युक्ती आणि शक्ती याच्या जोरावर ओमकार यशस्वी होणार असा विश्वास प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडिगिरी यांनी व्यक्त केला…!!
याआधी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा, युवा कबड्डी स्पर्धा, राज्यस्तरीय कनिष्ठ चॅम्पियनशिप स्पर्धा अशा अनेक कबड्डी स्पर्धामध्ये ओमकारने खेळाचे सुरेख दर्शन घडवले आहे.यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू कॉलेज मध्ये बी. ए. च्या प्रथम वर्षात तो शिकत आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण सरोळी येथील मराठी शाळेत झाले तर हायस्कूलचे शिक्षण राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन शिंगणापूर(कोल्हापूर ) येथे झाले.
एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील युवकांने मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. सिद्धार्थ देसाई, सुरज देसाई यांच्या प्रमाणे ओमकारनेही आपल्या गावासह चंदगड तालुक्याचे व कोल्हापूर जिल्ह्याचे नाव मोठे करावे. त्याला मिळालेल्या संधीचे सोने करावे. ओमकारसह त्याचे वडील नारायण पाटील, आई सौ. सुमन पाटील व त्याच्या कुटुंबातील सर्वांचेच मनापासून अभिनंदन.बेळगाव जवळ कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या सरोळी गावच्या खेळाडूचे बेळगावात देखील कौतुक होत आहे. पुढील कामगिरीसाठी त्याला टीम बेळगाव live कडून खूप खूप शुभेच्छा!!