बेळगाव लाईव्ह :रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे आयोजित केएलई किडनी फाउंडेशनचे डॉ. आर. बी. नेर्ली आणि डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटल बेळगावचे हृदयरोग तज्ञ डाॅ. रिचर्ड सलढाणा यांचा ‘अवयव दानाचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच यशस्वीरित्या पार पडला.
रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी प्रमुख वक्ते डॉ. नेर्ली व डाॅ. सारढाणा यांचा परिचय डाॅ. महांतेश पाटील यांनी करून दिला. यावेळी आपल्या व्याख्यानात डॉ. आर. बी. नेर्ली यांनी अवयव दान कायद्यातील तरतुदींची माहिती देण्याबरोबरच अवयव दान किती महत्त्वाचे आहे आणि त्याबाबत समाजात जनजागृती होणे किती गरजेचे आहे हे विशद केले.
डॉ. रिचर्ड सलढाणा यांनी हृदय प्रत्यारोपण आणि अवयव दानाची प्रक्रिया कशी होते याची माहिती दिली. तसेच ब्रेन डेड अर्थात मेंदू मृत झालेली एखादी व्यक्ती आपली त्वचा, नेत्र, यकृत, मूत्रपिंड आणि हृदय दान करण्याद्वारे आठ जणांचे प्राण वाचू शकते असे सांगितले.
अवयव दानासंदर्भातील राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहितीही त्यांनी दिली. अवयव प्रत्यारोपणामधील निधन पावलेल्या व्यक्तीचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार तसेच समाजाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्याबरोबरच अवयव दाना संदर्भात रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन समाजात जनजागृती करण्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचावे अशी विनंती डॉ. सलढाणा यांनी केली.
यावेळी अवयव दानावर झालेल्या चर्चेत डॉ. संजय पोरवाल आणि डॉ. राजेंद्र भांडारकर यांचा देखील सहभाग होता. शेवटी शरणराज चप्परबंदी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ बेळगावचे सचिव मनोज मायकल यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्य, निमंत्रित आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.