यंदाच्या प्रलंबित आगमना बरोबरच पावसाचे प्रमाण देखील घटल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील लावणी केलेले भात पीके वाळू लागली आहेत.
पाण्याची भरपूर आवश्यकता असलेल्या भात पिकाची जिल्ह्यातील बेळगाव व खानापूर तालुक्यासह कित्तूर आणि हुक्केरीच्या कांही भागात लागवड केली जाते. बेळगाव जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असल्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून येथील शेतकरी भाताचे पीक घेतात.
बासमती, इंद्रायणी आणि शुभांगिनी यासारख्या पारंपारिक जातीच्या भातासह आयआर -65 हे संकरित भात, तसेच ‘कुमुद’, ‘गजवेली’ ‘चिटक्या’ व ‘दोडगा’ यासारख्या स्वदेशी भाताचे पीक या ठिकाणी घेतले जाते. सध्या खानापूर व बेळगाव तालुक्यातील काही भागांमध्ये भात लावणी पूर्ण झाली आहे. यंदा बेळगाव जिल्ह्यातील 60,000 हेक्टर जमिनीमध्ये भात पेरणी आणि लावणी झाली आहे.
जूनमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पेरणीच्या मोसमाला यावर्षी उशीर झाला. मात्र जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपले पेरणीचे उद्दिष्ट गाठता आले. तथापी ऑगस्टमध्ये अतिशय कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे आता भात पीके वाळू लागली असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये बेळगाव जिल्ह्यात सर्वसामान्यपणे सरासरी 1703 मि.मी. पाऊस पडावयास हवा, मात्र यंदा तो अवघा 375.7 मि.मी. इतका पडला आहे. जुलैमध्ये जिल्ह्यात सर्वसामान्यपणे 2,578.3 मि.मी. पाऊस पडतो जो यावेळी 3,566.7 मि.मी. इतका झाला आहे. तथापि ऑगस्टमध्ये दरवर्षी सर्वसामान्यपणे 1699 मि.मी. इतका पाऊस होतो, जो आतापर्यंत म्हणजे गेल्या 18 ऑगस्टपर्यंत फक्त 294.7 मि.मी. इतका झाला आहे.
कडोली येथील भात उत्पादक शेतकरी रमेश मायानाचे म्हणाले की, भात पिकाला भरपूर पाऊस लागतो. परंतु गेल्या तीन आठवड्यात पाऊस झालेला नाही. परिणामी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे पिके वाळू लागली आहेत. या पिकांना विहिरी आणि बोअरवेल मधील पाणी द्यायचे म्हंटल्यास हेस्कॉमकडून व्यवस्थित वीजपुरवठा केला जात नाही. येत्या काही दिवसात पाऊस झाला नाही तर भात पीक संपूर्णपणे वाळून जाणार असून येत्या 15 दिवसात परिस्थिती गंभीर होणार आहे, असेही ते म्हणाले.
कृषी खात्याचे संयुक्त संचालक शिवनगौडा पाटील यांनी यासंदर्भात बोलताना बेळगाव जिल्ह्यातील भात पेरणीचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाले आहे. या महिन्यात कमी पाऊस झाल्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या भात पिकावर प्रतिकूल परिणाम होणार आहे याकरिता शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलावा कायम राखण्यासाठी पिकाला पाणी दिले पाहिजे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पुढील आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे आशा करूया की हा पाऊस भात पिकाला वाचवेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
बेळगाव जिल्ह्यात यंदाच्या खरीप मोसमात झालेला पाऊस (अनुक्रमे महिना, सर्वसामान्य पाऊस आणि पडलेला पाऊस यानुसार) पुढील प्रमाणे आहे. जून : 1703 मि.मी., 375.7 मि.मी. जुलै : 2578.3 मि.मी., 3566.7 मि.मी. ऑगस्ट : 1699.7 मि.मी., 18 ऑगस्टपर्यंत 294.7 मि.मी..