जुन्या गांधीनगरकडून येताना किल्ला सिग्नलच्या अलीकडे वळणावर दुभाजकाच्या ठिकाणी पेव्हर्सपेक्षा काँक्रीटचा मुख्य रस्ता उंच झाला आहे. परिणामी वाहन चालकांचा तोल जाऊन अपघात घडत असल्यामुळे याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जुन्या गांधीनगरकडून येताना किल्ला सिग्नलीकडे जाणाऱ्या वळणाच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर दुभाजक आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात आलेला हा काँक्रीट चा रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी कमी पडल्याने त्या ठिकाणी पेव्हर्स घालण्यात आले आहेत.
सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राहणारी असते. त्यामुळे जुन्या गांधीनगरकडून येताना रस्ता व दुभाजक यांच्यामधील पेव्हर्स खचले आहेत.
परिणामी पेव्हर्सशी समांतर नसलेला रस्ता दुचाकी वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. काँक्रीटचा रस्ता उंचावल्यामुळे त्याच्या काठावरून दुचाकी घसरून तोल गेल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहेत.
भविष्यात खचलेल्या पेव्हर्समुळे दुचाकीस्वार सिमेंटच्या दुभाजकावर कोसळून एखादा गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी लोकप्रतिनिधी तसेच स्मार्ट सिटीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी या रस्त्यावरून नेहमी ये -जा करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांकडून केली जात आहे.