Monday, December 23, 2024

/

‘त्या’ दुर्घटनेस इमारतीतील बेजबाबदार वायरिंग कारणीभूत

 belgaum

शाहूनगर येथे विजेचा धक्का बसून तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू होण्यास विना प्लग खुली ठेवण्यात आलेली धोकादायक इलेक्ट्रिक वायर कारणीभूत आहे. बांधकाम सुरू असलेल्या संबंधित इमारतीमधील इलेक्ट्रिक वायरिंग अखंड शाबूत नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे, असे हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता विनोद करूर यांनी स्पष्ट केले आहे.

विजेचा धक्का बसून नातीसह आजोबा -आजी असे तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी शाहूनगर तेथे घडली. घटनास्थळी दाखल झालेल्या कार्यकारी अभियंता विनोद करूर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना उपरोक्त स्पष्टीकरण दिले. हेस्कॉम कार्यकारी अभियंता करूर म्हणाले की, सदर दुर्घटनेस हेस्कॉम जबाबदार नाही.

कारण हेस्कॉमची वीजपुरवठा आणि देखभालीची जबाबदारी इमारती नजीकच्या खांबापर्यंत असते. त्या पुढील इमारतीसाठीची सर्व्हिस वायर आणि आतील सर्व इलेक्ट्रिक वायरिंगची जबाबदारी संबंधित बिल्डर, सिव्हिल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरची असते.

बांधकाम सुरू असलेल्या इमारतींमधील इलेक्ट्रिक वायरिंग अखंड शाबूत राहील याची काळजी इलेक्ट्रिशियन्सनी घेतली पाहिजे. मात्र दुर्दैवाने या इमारतीच्या बाबतीत तशी काळजी घेण्यात आलेली नव्हती. येथील एक्सटेंशन वायरचे इन्सुलेशन निघालेले आहे तसेच स्पेअर वायर वापरून इलेक्ट्रिकचे काम केले असून मेल वायरला प्लग बसवण्यात आला नव्हता. त्यामुळे विना प्लगची विजेची वायर खाली लोंबकळत होती. ही वायर पकडल्यामुळे नातीला विजेचा धक्का बसला आणि तिला वाचवण्यास गेलेल्या आजोबा -आजींना देखील विजेचा तीव्र धक्का बसून ते गतप्राण झाले. आज सकाळी 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास इमारत बांधकामाला पाणी मारण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली, अशी माहिती कार्यकारी अभियंता विनोद करूर यांनी दिली.Shahu nagar

दुर्घटनेतील मयत आजोबा -आजीची नांव इराप्पा आणि शांतव्वा अशी असून मृत्युमुखी पडलेली त्यांची नात 8 वर्षाची होती. रामदुर्ग तालुक्यातील बंजारा समाजातील असलेले हे तिघेजण शाहूनगर येथे एका इमारतीच्या बांधकामा ठिकाणी वॉचमनचे काम करणाऱ्या कुटुंबातील होते. शाहूनगर येथील दुर्घटनेची माहिती मिळताच महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर माजी आमदार अनिल बेनके आदींनी भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केलं.

यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर यांनी सदर दुर्घटनेबद्दल मयताच्या कुटुंबीयांनी कोणतीही मागणी केलेली नाही. तथापि आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर सदर घटना घालून दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याखेरीज या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतांच्या अंत्यविधीच्या खर्चासाठी लक्ष्मीताई फाऊंडेशनतर्फे 50 हजार रुपयांची मदत आपण देत असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे सदर दुर्घटनेशी हेस्कॉमचा काहीही संबंध नाही, याला केवळ इमारतीचे मालक जबाबदार आहेत असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.