टिळकवाडी येथील मालमत्ताधारक विशेष करून सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ तसेच राॅय रोड, नेहरू रोड, महर्षी रोड आणि रानडे रोड येथील मालमत्ताधारकांच्या मिळकतींच्या उताऱ्यावर आता महापालिकेच्या मालकी हक्काची नोंद केली जात असल्यामुळे खळबळ उडाली आहे. तथापि ब्रिटिश काळात संबंधित मिळकती भाडे करारावर देण्यात आल्या असल्यामुळे आता त्यावरील मालकी हक्कात बदल करण्यात येत असल्याचे समजते.
टिळकवाडी येथील संबंधित परिसरातील ज्या मिळकतींचे गेल्या 6 महिन्यात खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत. त्या मिळकतींच्या खाते बदलाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महापालिकेकडून उतारा देण्यात आला आहे. मात्र त्या उताऱ्यावर मिळकतीच्या मालकाचे नांव या सदरात ‘म्युन्सिपालटी’ असा उल्लेख करण्यात येत आहे. त्यामुळे त्यावरून सदर भागातील सर्वच मिळकती म्युन्सिपालटीच्या म्हणजेच महापालिकेच्या मालकीच्या असल्याचे सिद्ध होत आहे.
मिळकतींच्या कब्जा धारकाच्या सदरात मात्र खरेदीदाराचे नांव नमूद केले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेकडून खाते बदलानंतर उतारे देताना त्यावर या पद्धतीने मालकी हक्काची नोंद केली जात आहे. मात्र यामुळे मिळकतींचा कब्जा महापालिकेकडून घेतला जाणार नसला तरी खरेदीदार हे थेट मालक न होता कब्जेदार होत आहेत. परिणामी भविष्यात या मिळकतींची खरेदी विक्री करताना उप नोंदणी कार्यालयाने महापालिकेची ‘ना हरकत’ घेण्याची सक्ती केल्यास मोठी समस्या उद्भवणार आहे.
टिळकवाडीतील एका मिळकतीवर आधी एका व्यक्तीचे नांव मालक असे नमूद होते. त्या व्यक्तीने मिळकतीची विक्री केली. मिळकत खरेदी केलेल्या व्यक्तीने खरेदीदस्त जोडून खाते बदलासाठी अर्ज केला. महापालिकेने खाते बदल केला पण मालकी हक्काच्या सदरात खरेदीदाराचे नाव नमूद केले नाही. याबाबत महापालिकेकडे विचारणा केली असता टिळकवाडीतील मिळकतींची मूळ मालकी महापालिकेची असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
दरम्यान या संदर्भात महापालिकेच्या महसूल विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार टिळकवाडीतील उपरोक्त विभागातील सर्व मिळकती या ब्रिटिश काळात बेळगाव म्युन्सिपालटीकडून भाडेकरारने दिल्याची माहिती उपलब्ध आहे 1930 साली बेळगाव म्युन्सिपालटी अस्तित्वात होती. त्यावेळी 30 वर्षांच्या भाडेकरारे कराराने या मिळकती देण्यात आल्या होत्या. मात्र 1947 नंतर म्युन्सिपालटीने या मिळकतींचा कब्जा घेतला नाही. त्यामुळे मिळकती ज्यांच्या कब्जात होत्या त्यांच्याकडेच राहिल्या.
एकंदर त्या मिळकतींवरील म्युन्सिपालटीचा म्हणजेच बेळगाव महापालिकेचा मालकी हक्क आजही कायम आहे. हा मालकी हक्क बदलण्याबाबत महापालिकेकडून भूमीअभिलेख खात्याकडे प्रयत्न झालेही असले तरी त्यांना यश आले नाही. त्यामुळे महापालिकेकडून आता त्या मिळकतींचे उतारे देताना त्यावरील मालकी हक्कात बदल करण्यात येत आहे. त्यासाठी मालकी हक्काच्या सदरात महापालिकेचे तर मिळकत खरेदी केलेल्यांचे नांव कब्जेदाराच्या सदरात नमूद केले जात आहे.