केंद्रीय संपर्क कार्यालय, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे स्वातंत्र्य दिन आणि केंद्र सरकारचे बेळगावातील प्रकल्प तसेच विविध खात्यांच्या प्रकल्पावरील माहिती कार्यक्रम या संदर्भातील पाच दिवसांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे या महिन्यात आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मतदार संघ प्रसिद्धी अधिकारी श्रुती एस. टी. यांनी दिली.
बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पूर्वतयारीच्या बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या.
जिल्हा प्रशासन कृषी खाते महिला व बाल विकास खाते तसेच अन्य खात्यांच्या सहकार्याने या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या प्रकल्पांवर आधारित पाच दिवसांचे छायाचित्र प्रदर्शन आणि माहिती कार्यक्रम आयोजित केला जाईल.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. विविध प्रकल्पांचे प्रतिनिधी आणि लाभार्थींचा या कार्यक्रमात सहभाग आहे असेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. श्रुती यांनी प्रदर्शनाच्या निमित्ताने पाच दिवस शालेय मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाणार असल्याचे सांगितले.
सदर छायाचित्र प्रदर्शन आणि माहिती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संबंधित सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले.
बैठकीस जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.