बेळगाव लाईव्ह विशेष :एकेकाळी जगामध्ये हॉकी या खेळात भारताचा दबदबा होता. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करताना आपणाला फक्त मेजर ध्यानचंद, रूपसिंग बलबीर सिंग यासारख्या दिग्गज खेळाडूंची नावे नजरेसमोर येत असले तरी बेळगावचे बंडू पाटील आणि बेळगाव ज्यांची हॉकीची कर्मभूमी होती ते शंकर लक्ष्मण हे दोघे ऑलिम्पियन हॉकीपटू देखील आपल्या परीने दिग्गजच होते.
आज 29 आगष्ट राष्ट्रीय खेळ दिना निमित्त बेळगावच्या जुन्या खेळाडूंनी मिळवलेले यश बेळगावातील जनतेला आणि होतकरू युवा खेळाडू अवगत करून देत आहोत .बेळगाव लाईव्ह युवा खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देत आलेले आहे मागील वर्षी अनेक खेळाडूंचा सत्कार केला होता यावर्षी जुन्या खेळाडू आठवण म्हणून त्यांनी घेतलेले परिश्रम मिळवलेले यश समोर ठेवत आहोत.
बेळगावच्या मातीत तयार झालेले ऑलिम्पिक हॉकी खेळाडू बंडू पाटील यांचा जन्म बेळगावमध्ये 1 जानेवारी 1936 रोजी झाला. बंडू पाटील यांनी कॅन्टोन्मेंट हद्दीत असणाऱ्या मराठा लाईट इन्फंट्री हॉकी ग्राउंड, धोबीघाट या मैदानात सरावाला सुरुवात केली. भारताने 1960 मध्ये रोम ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक,1962 मध्ये आशियाई रौप्य पदक आणि 1964 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.
या पद्धतीने भारतीय हॉकी संघाला अजिंक्य करण्यामध्ये बंडू पाटील यांचाही मोलाचा वाटा होता. दुसरे ऑलिम्पिक हॉकी खेळाडू म्हणजे शंकर लक्ष्मण हे होत. मूळचे छावनी परिषद मध्यप्रदेश येथील असलेल्या शंकर लक्ष्मण यांचा जन्म 7 जुलै 1933 रोजी झाला. शंकर लक्ष्मण याचा आवडता खेळ फुटबॉल होता. ते बेळगावला 5 मराठा लाईट इन्फंट्री येथे 1947 मध्ये वादक म्हणुन रुजू झाले होते. 1920 ते 1995 पर्यंत सातहून अधिक दशकं बेळगावमध्ये हॉकी हा खेळ अतिशय लोकप्रिय होता.
बेळगावला सेवा बजावत असताना शंकर लक्ष्मण यांनी येथील मातीमध्ये हॉकी खेळण्याचा ध्यास घेतला. फुटबॉल सोडून त्यांनी हॉकीची निवड केली आणि अल्पावधीत आपली चमक दाखवण्यास सुरुवात केली. हॉकी करिता आपले जीवन व्यतीत करणारे शंकर लक्ष्मण 1956,1960 आणि 1964 ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे गोलरक्षक होते. या संघाने दोन सुवर्ण पदके आणि एक रौप्य पदक जिंकले होते.
आंतरराष्ट्रीय हॉकी संघाचा कर्णधार बनणारे ते पहिले भारतीय गोलरक्षक होते. हॉकी खेळातील योगदानाबद्दल भारत सरकारने शंकर लक्ष्मण यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीने सन्मानित केले होते. 1979 मध्ये शंकर लक्ष्मण बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट केंद्रात मानद कॅप्टन पदावरून सेवा निवृत्त झाले.
बंडू पाटील, शंकर लक्ष्मण यांच्यानंतर बेळगावच्या मातीत अनेक दर्जेदार हॉकी खेळाडू निर्माण झाले ज्यांनी आपले जीवन या खेळासाठी समर्पित केले. मात्र सध्याचे वातावरण पाहत बेळगावमध्ये हॉकी खेळाला वाईट दिवस आले आहेत असे म्हणावे लागेल. सुसज्ज मैदान आणि दर्जेदार प्रशिक्षणाअभावी सध्या शहरातील होतकरू युवा हॉकी खेळाडूचे भवितव्य वाया जात असून ही अत्यंत खेदाची बाब आहे.