बेळगाव लाईव्ह विशेष :आज अनेक भारतीय खेळाडू वेगवेगळ्या खेळात जगात नांव कमवत आहेत. ऑलिम्पिक गाजवून पदकं मिळवत आहेत. मात्र याचं खरं श्रेय 1920 च्या अँटवर्प (बेल्जियम) ऑलिम्पिक स्पर्धेद्वारे जागतिक क्रीडा क्षेत्राला भारताच्या हजारो वर्षांच्या संयमी, दृढनिश्चयी कणखर इतिहासाची जाणीव करून देणारे बेळगावचे जिगरबाज आंतरराष्ट्रीय धावपटू पी. डी. चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाते. चौगुले यांच्या या कर्तुत्वाला 103 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्त…
आज 29 आगष्ट राष्ट्रीय खेळ दिना निमित्त बेळगावच्या जुन्या खेळाडूंनी मिळवलेले यश बेळगावातील जनतेला आणि होतकरू युवा खेळाडू अवगत करून देत आहोत .बेळगाव लाईव्ह युवा खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देत आलेले आहे मागील वर्षी अनेक खेळाडूंचा सत्कार केला होता यावर्षी जुन्या खेळाडू आठवण म्हणून त्यांनी घेतलेले परिश्रम मिळवलेले यश समोर ठेवत आहोत.
ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे कर्नाटक व बेळगावचे पहिले खेळाडू म्हणजे पी. डी. चौगुले हे होत. भारताच्या पहिल्या ऑलम्पिक संघाचे प्रतिनिधित्व फडेप्पा दरेप्पा उर्फ पी. डी. चौगुले यांनी केली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, चमकलेल्या चौगुले याचा जन्म 1902 मध्ये बेळगावच्या शेरी गल्ली येथे झाला. चौगुले यांना सुरुवातीला कुस्तीची आवड होती. ते आखाड्यातील (रिंगण) लढतींमध्ये भाग घेत असत. प्रतिस्पर्ध्याशी लढत असताना हाताला दुखापत झाली त्यांनी कुस्ती खेळला राम राम ठोकला. चौगुले हे लहानपणापासूनच जिद्दी होते. शाळेतमध्ये असताना त्यांनी सहज धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि तो पी. डी. चौगुलेंच्या जीवनातील टर्निग पॉइंटची ठरला. शाळेत धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणारे चौगुले अल्पावधीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चमकू लागले.
डेक्कन जिमखान्यातर्फे 24 एप्रिल 1920 रोजी ऑलम्पिक स्पर्धेसाठी निवड चांचणी घेण्यात आली. यामध्ये भारताच्या सहा खेळाडूची निवड झाली.
त्यामध्ये कुस्तीसाठी कोल्हापूरचे शिंदे, मुंबईचे कुमार नवले, छोट्या धावण्याच्या शर्यतीसाठी कलकत्ताचे पूर्णचंद्र बॅनर्जी, तर मॅरेथॉन शर्यतीसाठी साताऱ्याचे सदाशिव दातार, हुबळीचे एच. डी. कैकाडी आणि बेळगावचे पीडी चौगुले यांची निवड केली गेली. बेल्जियमच्या अँटवर्प येथे 1920 मध्ये भरणाऱ्या जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ही निवड झाली. या स्पर्धेसाठी भारताचा संघ 5 जून 1920 रोजी जहाजाने इंग्लंडला निघाली. तिथे त्यांचा कांही दिवस इंग्रज प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सराव होणार होता. तथापी प्रवासाच्या पहिल्या दिवसापासून या खेळाडूंच्या अडचणींना प्रारंभ झाला. पहिल्यांदाच करत असलेला जहाजाचा मोठा प्रवास त्यांना झेपत नव्हता. सर्व खेळाडूंना उलटयानी बेजार केले. त्यात पी. डी. चौगुले हे शाकाहारी असल्यामुळे त्यांच्या खाण्याचे प्रचंड हाल होत. पी.डी चौगुलेनी तिथे बरेच नाव कमावले.
ऑलम्पिक स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी अमेरिकेतील वर्तमानपत्रामध्ये “हिंदू डार्क हॉर्स” ऑलिंपिकमध्ये चमकणार, अशा बातम्या झळकू लागल्या. ऑलिंपिकसाठी 10 ऑगस्ट 1920 रोजी भारतीय संघ अँटवर्पमध्ये दाखल झाला. प्रवास, खाण्याचे हाल व हवामानातील बदल यामुळे दुर्दैवाने भारतीय खेळाडू स्पर्धेतून लवकर बाहेर पडले. बॅनर्जी तर पहिल्याच फेरीत गारद झाले. आता सर्वांच्या आशा स्टार खेळाडू असणाऱ्या पी. डी. चौगुले यांच्यावर होत्या. चौगुले यांनी 10,000 मी. स्पर्धेच्या पात्रता फेरीत धावायला सुरवात केली. मात्र 3 कि. मी.वर एका माथेफिरूने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्याचा नेम हुकला पण घाबरलेल्या चौगुले यांनी स्पर्धा निम्म्यात सोडली. चौगुले यांची मुख्य 42 कि. मी. मॅरेथॉन स्पर्धा 22 ऑगस्ट रोजी होती. उर्वरित खेळाडूंनी चौगुले समजावून धावण्यास तयार केले. दातार आणि चौगुले स्पर्धेत उतरले तर कैकाडी सहभागीच झाले नाहीत. भर पावसात स्पर्धा सुरू झाली आणि 15 कि. मी.पर्यंत चौगुले यांनी आघाडी घेतली होती. मात्र पुढे शूजमध्ये पाणी जाण्याबरोबरच जखमा झाल्यामुळे त्यांचा वेग मंदावला. सदाशिव दातार स्पर्धा अर्ध्यावर सोडली, तथापी चौगुले प्रचंड वेदना घेऊन जिद्दीने धावतच होते. शेवटी प्रचंड आत्मविश्वास, जिद्द आणि सहनशीलतेच्या जोरावर पी. डी. चौगुले यांनी ही स्पर्धा पूर्ण केली.
“अँटवर्प ऑलिंपिकमध्ये भावना हेलवणारे एकच दृश्य होते, ते म्हणजे मरेथॉनच्या अंतिम टप्प्यात स्टेडियममध्ये प्रवेश करणाऱ्या चौगुले यांच्या चेहऱ्यावरच्या वेदना व निराश यांच्यावर त्यांच्या संयमित कणखरपणाने केलेली मात भारताच्या हजारो वर्षांच्या संयमशील इतिहासाचे प्रतीक होते” असे तत्कालीन एका ब्रिटिश पत्रकाराने लिहून ठेवले आहे. चौगुले ही स्पर्धा 2 तास 50 मिनिट 45.2 सेकंदमध्ये पूर्ण करत 19 व्या स्थानकावर राहिले. त्याआधी 1919 साली 27 मैलांची मॅरेथॉन जिंकून त्यांनी अनधिकृत विश्व विक्रम देखील केला होता. चौगुलेच्या या कर्तुत्वाला 103 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज अनेक भारतीय खेळाडू वेगवेगळ्या खेळात जगात नांव कमवत आहेत. ऑलिम्पिक गाजवत आहेत, पदकं मिळवत आहेत. याच श्रेय पी.डी. चौगुलेंच्या सारख्या निडर खेळाडूंनी सुरू केलेल्या परंपरेला जाते. मात्र आज अशी खेदजनक परिस्थिती आहे की बेळगावातील आपल्या पैकी अनेकांना पी. डी. चौगुले या जिगरबाज धावपटूचे नांव देखील ठाऊक नाही.