बेळगाव शहरातील कचऱ्याची समस्या महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी गांभीर्याने घेतली असून त्यांनी आज शुक्रवारी भल्या पहाटे शहराच्या विविध भागांना भेटी देऊन तेथील कचरा साफसफाईच्या कामाबरोबरच कचरा उचल कामाची पाहणी केली.
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज पहाटे 5:30 वाजता प्रथम सदाशिवनगर येथील पालिकेच्या वाहन शाखेला भेट देऊन तेथील वाहनांची पाहणी केली. तसेच वाहन चालकांची हजेरी तपासून सर्व वाहन चालक आणि क्लीनर्सना सकाळी 5:45 वाजता कामावर हजर राहण्याची सूचना केली.
त्यानंतर महापालिका आयुक्त स्वतः कचऱ्याच्या गाडीत बसून किल्ला परिसरातील बीट कचेरीला भेट दिली. त्या ठिकाणी त्यांनी पौरकार्मिकांचे हजेरी पुस्तक तपासून आरोग्य निरीक्षकांना आवश्यक सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी नगरसेविका अफरोज मुल्ला यांच्या समवेत प्रभाग क्र. 5 मधील खडेबाजार, दरबार गल्ली येथील कचरा सफाई आणि कचऱ्याची उचल यांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी संबंधित आरोग्य निरीक्षकाला सूचना करण्याबरोबर स्थानिक लोकांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि त्या तक्रारींचे निवारण करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. तेथून कोतवाल गल्ली आणि काकर गल्ली भाजी मार्केटला भेट देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली. तसेच भाजी मार्केटमधील टाकाऊ भाजीपाल्याच्या कचऱ्याची त्या त्या दिवशी रात्री 9 नंतर त्वरेने उचल करण्यात यावी असा आदेश त्यांनी दिला. त्यानंतर मनपा आयुक्तांनी पै हॉटेलला भेट देऊन तेथील टाकाऊ अन्नाचे विघटन करणाऱ्या प्रकल्पाची पाहणी केली.
मनपा आयुक्तांनी मध्यवर्ती बस स्थानकालाही भेट देऊन स्वच्छता कामाची पाहणी केली. तसेच बस स्थानकावरील कचऱ्याची वेळच्या वेळी उचल करण्याचा आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. बस स्थानकातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी रुक्मिणीनगर परिसराला भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना संबंधित आरोग्य निरीक्षकाला केली.
यावेळी त्यांनी रुक्मिणीनगर उद्यानाला भेट देऊन तेथील गार्डन इन्स्पेक्टरला उद्यानाची स्वच्छता आणि योग्य निगा राखण्याबाबत सूचना केल्या. आपल्या आजच्या या पाहणी दौऱ्याप्रसंगी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी नागरिकांच्या समस्या व तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यांचे निवारण केले जावे अशी सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली.