बेळगाव लाईव्ह:मराठा मंडळ ही कर्नाटकातील सर्व क्षेत्रात अग्रगण्य असणारी शिक्षण आहे. याच शिक्षण संस्थेचे शिल्पकार शिक्षण महर्षी माजी अध्यक्ष कै. नाथाजीराव गुरूअण्णा हलगेकर यांच्या त्या धर्मपत्नी होत्या.
कोल्हापूरच्या माहेरवाशीण असणाऱ्या पद्मजादेवी यांचा जन्म येथील नामांकित पवार घराण्यात झाला होता. पती कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या शैक्षणिक कार्यात स्वतःची स्वप्नं विलीन करून बेळगाव परिसरात शिक्षणाचा वेगळा आयाम निर्माण करण्यात त्यांचा नेहमीच उल्लेखनीय सहभाग राहीला आहे.
सगळीकडे नेहमी फुलमाळेतील फुलांचं कौतुक होते पण त्या फुलांना गच्च पकडून ठेवणाऱ्या धाग्याचा कौतुक कधीच होत नाही. प्रसिद्धी परान्मुख असणाऱ्या आदरणीय पद्मजादेवी हलगेकर यांचं जगणं ही असच होतं म्हणून त्या कधीच प्रकाश झोतात आल्या नाहीत. किंबहुना त्यांनी निरंतर तेवत राहणाऱ्या समई प्रमाणे शैक्षणिक प्रकाश देण्याचं कार्य आजीवन चालू ठेवले होते याची साक्ष म्हणजे मराठा मंडळाचा विशाल असा यशस्वी शैक्षणिक पसारा आहे.
आदरणीय कै. पद्मजादेवी हलगेकर या मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू तसेच पुणे स्थित डॉ. सत्त्वशीला शिरोळे व मराठा मंडळाचे उपाध्यक्ष राजेश हलगेकर यांच्या मातोश्री असून, स्नूषा विश्वस्त सौ. धनश्री राजेश हलगेकर व बेंगळुरू येथील विद्यमान एम एल सी श्री नागराजू यादव आणि पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती मान. चैतन्य शिरोळे यांच्या सासुबाई होत्या. त्यांच्या जाणेने असंख्य नातवंडाचे गोकुळ हरवले आहे.
माणसाचं अस्तित्व अशाश्वत आहे., ते ठराविक काळासाठी पृथ्वीतलावर सहभाग नोंदवते. परंतु त्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा किती दीर्घकाळ टिकणार आहेत हे त्यांचे कर्तुत्व अधोरेखित करणाऱ्या रेषा किती ठळक आहेत यावरच ठरते. श्रीमती कैलासवासी पद्मजादेवी यांनी कै.नाथाजीराव हलगेकरांच्या शैक्षणिक प्रकाशमान भूमिके पाठीमागची भूमिका वटवताना आपल्या अस्तित्वाचा मंद शितल छाया प्रकाश गडद केला यात काही शंकाच नाही.