लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज पहाटे बेळगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोष अनिशेट्टर यांच्या घरावर छापा टाकून कागदपत्रांची तपासणी व चौकशी सुरू केली आहे.
या घटनेमुळे महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने आज गुरुवारी पहाटे सुभाषनगर बेळगाव येथील अपार्टमेंटमधील महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोष अनिशेट्टर यांच्या घरावर छापा टाकला आहे. त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त अनिशेट्टर यांच्या भावाच्या अल्लदकट्टी गावातील घरावरही लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे.
संतोष अनिशेट्टर यांची कांही वर्षांपूर्वी बेळगावला बदली झाली आहे. सध्या ते महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. अचानक घरावर छापा टाकण्याद्वारे लोकायुक्त पथकाने आज पहाटे पहाटे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना धक्का दिला आहे.
बेळगावातील लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या चौकशी आधारे धारवाडमध्ये धाड टाकून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी देखील सुरू केली आहे.
ही चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी आज दुपारी 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सुरू होती. त्यासाठी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी त्या काळात महापालिकेचे महसूल कार्यालय बंद करून त्याला टाळे ठोकले होते.
कागदपत्र तपासणी आणि चौकशीअंती लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कांही महत्त्वाची कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली असल्याचे सूत्रांकडून समजते. लोकायुक्त विभागाच्या उपरोक्त कारवाईमुळे महापालिकेत खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.