पाॅलाइट्स ऑफ बेलगाम वर्ड वाईड आणि सेंट पॉल्स हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे उद्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिराच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी सकाळी रक्तदान जनजागृती फेरी काढण्यात आली.
पाॅलाइट्स ऑफ बेलगाम वर्ड वाईड आणि सेंट पॉल्स हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे उद्या मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सेंटपॉल्स हायस्कूल आवारामध्ये सकाळी 8:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. सदर शिबिराच्या अनुषंगाने आज सोमवारी सकाळी कॅम्प परिसरात रक्तदान जनजागृती फेरी काढण्यात आली.
सदर जनजागृती फेरीमध्ये सेंटपॉल्स शाळेतील एअरविंग, आर्मी आणि नेव्हीचे एनसीसी छात्र सहभागी झाले होते. अग्रभागी रक्तदान शिबिराच्या बॅनरसह हातात जनजागृतीपर फलक घेऊन शिस्तबद्धरित्या निघालेली ही फेरी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
जनजागृती फेरी दरम्यान रक्तदान संदर्भात घोषणा देण्याबरोबरच ठीक ठिकाणी फेरी थांबवून उद्याच्या रक्तदान शिबिराबद्दल माहिती दिली जात होती. एनसीसी छात्रांसह या जनजागृती फेरीत शिक्षक वर्गासह पाॅलाइट्स ऑफ बेलगाम वर्ड वाईडचे सदस्य आणि सेंट पॉल्स हायस्कूल माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.