बेळगाव लाईव्ह: कर्नाटक राज्य बागायत खाते, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बागायत अभियान आणि फळाफुलांसह विविध वनस्पतींच्या रोपांच्या भव्य विक्री प्रदर्शन वजा बागायत महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.
क्लब रोडवरील ह्युम पार्क येथे आयोजित सदर उद्घाटन समारंभास उद्घाटक म्हणून बेळगावच्या खासदार मंगला अंगडी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, बेळगाव जिल्हा बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड आदी मान्यवर आणि निमंत्रित उपस्थित होते.
खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बागायत खात्याच्या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर खासदारांसह इतर मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांना बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रदर्शनातील झाडं व वनस्पतींच्या विविध रोपट्यांबद्दल माहिती दिली.
कर्नाटक राज्य बागायत खात्यातर्फे राज्यातील बागायत क्षेत्र वाढावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने सदर बागायत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाच्या माध्यमातून आंबा, पेरू, काजू, चिक्कू, फणस, लिंबू, नारळ यासह विविध शोभिवंत झाडे तसेच भाजीपाला आदींची विक्री केली जाणार आहे. याव्यतिरिक्त सेंद्रिय शेती, मध उत्पादन आणि आळंबी उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या महोत्सव वजा विक्री प्रदर्शनात फळांच्या विविध प्रजातींची रोप एकाच छताखाली पहावयास मिळणार आहेत.
विशेष म्हणजे त्यांची माहिती देऊन विक्री केली जाणार आहे. आज उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी सदर प्रदर्शनास शेतकरी बांधवांसह शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
क्लब रोडवरील ह्युम पार्क येथे आजपासून सुरू झालेला हा बागायत महोत्सव येत्या रविवारी 27 ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.