नेहरूनगर येथील हनुमान हॉटेलनजीक ऑटोरिक्षा स्टॅन्डच्या ठिकाणी आमच्या ऑटोरिक्षा थांबवण्यास लेखी परवानगी द्यावी अशी मागणी हनुमान हॉटेल ऑटोरिक्षा स्टॅन्डच्या रिक्षा चालकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
बेळगाव ऑटो रिक्षा मालक आणि चालक संघटनेच्या नेतृत्वाखाली एका निवेदनाद्वारे उपरोक्त मागणी मनपायुक्तांकडे करण्यात आली आहे. मनपा आयुक्त उपलब्ध नसल्यामुळे ऑटो रिक्षा चालकांनी आपले हे निवेदन पोस्टाद्वारे त्यांना धाडले आहे.
हनुमान हॉटेल नजीकचे ऑटो रिक्षा स्टॅन्ड गेल्या सुमारे 30 वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र अलीकडे रहदारीस अडथळा होत असल्याचे कारण पुढे करून रहदारी पोलिसांकडून सदर रिक्षा स्टॅन्डवर ऑटो रिक्षा थांबविण्यास मज्जाव केला जात आहे.
याबाबत ऑटो रिक्षा चालकांनी विचारणा केल्यास महापालिकेकडून लेखी परवानगी पत्र घेऊन या आणि मग स्टॅंडवर रिक्षा लावा असे सांगितले जात आहे. अलीकडच्या महागाईच्या दिवसात ऑटोरिक्षा व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे. यात भर म्हणून सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना सुरू केली आहे.
त्यामुळे आमच्या व्यवसायाला मोठा फटका बसला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होत आहे.तेव्हा आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला हनुमान हॉटेल ऑटो रिक्षा स्टॅन्डच्या ठिकाणी आमच्या रिक्षा थांबवण्यास परवानगी द्यावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील महापालिका आयुक्तांना धाडण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. आयुक्तांना निवेदन सादर करण्यासाठी आज बहुसंख्या ऑटो रिक्षा चालक उपस्थित होते.
ऑटो चालकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी pic.twitter.com/0hpz9ERbPt
— Belgaumlive (@belgaumlive) August 11, 2023