बेळगाव लाईव्ह :नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीमध्ये बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपाने आपला दबदबा कायम राखला आहे. 41 पैकी एकूण 19 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे, असा दावा भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला आहे.
ग्रामीणचे आमदार मंत्री झाल्यापासून दबाव तंत्राला वेग आला आहे, प्रसंगी अनेक आमिशे दाखवली जात आहेत. तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते नेते व ग्रामपंचायत सदस्य आदींच्या संयुक्त प्रयत्नाने 19 ग्रामपंचायतीवर भाजपाने आपले वर्चस्व राखले आहे, 42 पैकी 41 पंचायतीच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत तसेच एक पंचायतीवर न्यायालयीन तक्रारीमुळे निवडणुका प्रलंबित आहेत.
भाजपा- 19, काँग्रेस -22 तर म. ए. समिती – 1 अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा दावा जाधव यांचा आहे.
काँग्रेसचे सरकार आल्यामुळे ग्रामीणच्या आमदार आणि त्यांचे बंधू विधान परिषद सदस्य यांनी सरकारी अधिकार्यांवर दबाव आणून आपल्या काँग्रेस पक्षाला अनुकूल होईल असे ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे आरक्षण आणूनसुद्धा खूप मोठी उलथापालथ करू शकले नाहीत.
जनतेला खोटी आशा, आश्वासने देऊन कर्नाटक राज्यामध्ये सत्तेत आलेल्या काँग्रेस पक्षाची लबाडी उघड होत आहेत. काँग्रेसने घोषणा केलेल्या अनेक गॅरेंटी योजना अंमलात आणल्या जात नाहीत. योजनांचा केवळ 20 ते 25 टक्के लाभार्थींनाच त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे गॅरंटी योजनाचा फज्जा उडाला आहे. तरी दुसरीकडे भाजपा सरकारने लागू केलेल्या 19 योजना बंद करून शेतकरी, विद्यार्थी व मागासवर्गीय जनतेवर काँग्रेस सरकारने अन्याय केला आहे.
रेशनकार्ड धारकांना पाच किलो तांदूळ जे मिळत आहेत ते केंद्रातील मोदी सरकार देत आहे, काँग्रेसने गॅरेंटी योजनेप्रमाणे आणखी 10 किलो तांदूळ द्यायला पाहिजे होते पण फक्त पाच किलो तांदूळचे पैसे दिले जात आहेत ही जनतेची फसवणूक आहे, असा आरोप धनंजय जाधव यांनी केला आहे.