वन खात्याच्या दुर्लक्षामुळे इंदिरा कॉलनी, भडकल गल्ली आणि कोळी गल्ली कॉर्नरवरील सैनिक बोर्डच्या कंपाउंड मधील जुने मोठे निलगिरीचे झाड कोसळून चार इमारतींचे नुकसान झाल्याची दुर्घटना काल मंगळवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. दैव बलवत्तर म्हणून सदर दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही.
झाड कोसळल्यामुळे मीरा मनोहर जाधव, सुवर्णा ज्योतिबा जाधव, सांबरेकर आणि सुमन बाबुराव जाधव यांच्या मालकीच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. इंदिरा कॉलनी, भडकल गल्ली आणि कोळी गल्ली कॉर्नरवरील सैनिक बोर्डच्या कंपाउंड मधील कोसळलेल्या झाडासंबंधी स्थानिक रहिवाशांनी यापूर्वी वनखात्याकडे दोन-तीन वेळा लेखी तक्रार केली होती.
निलगिरीचे सदर झाड धोकादायक स्थितीत असल्यामुळे ते लवकरात लवकर हटविण्याची विनंती वनखात्याकडे करण्यात आली होती. मात्र वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आजतागायत त्याची दखल घेतली नव्हती.
वन खात्याच्या दुर्लक्षाचा परिणाम म्हणजे पूर्ण वाढ झालेले ते प्रचंड मोठे निलगिरीचे जुने झाड काल मंगळवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास शेजारील चार इमारतींवर कोसळले. त्यामुळे संबंधित इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
तक्रार करून देखील दखल घेण्यात न आल्यामुळे झाड कोसळण्याच्या या दुर्घटनेस वनखातेच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तसेच प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.