राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी बेळगाव येथे ईएसआय हॉस्पिटल सुरू करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला असता हा प्रकल्प सध्या भू निश्चितीच्या टप्प्यावर असल्याचे सकारात्मक उत्तर कामगार आणि रोजगार खात्याचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिले आहे.
कर्मचाऱ्यांच्या राज्य विमा महामंडळाने (ईएसआय) बेळगावसह कर्नाटकात विविध ठिकाणी नव्या ईएसआय हॉस्पिटल्सची उभारणी आणि सुधारणांना मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने बेळगाव येथील 50 बेड्सच्या ईएसआय हॉस्पिटलचे 100 बेड्सच्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले जाणार आहे.
त्यासाठी या हॉस्पिटलची सुधारणा आणि पुनर्बांधकाम केले जाणार असून हा प्रकल्प सध्या भू निश्चितीच्या अर्थात जागा निश्चितीच्या टप्प्यावर आहे. सध्या बेळगाव येथील ईएसआय स्कीम (ईएसआयएस) हॉस्पिटलसह कर्नाटकात एकूण 11 ईएसआय हॉस्पिटल्स आहेत. बेळगाव येथील या हॉस्पिटलची सध्याची इमारत जीर्ण झाली असल्यामुळे ईएसआयसीने त्या ठिकाणी नवी हॉस्पिटल इमारत उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार या हॉस्पिटलची सध्याची 50 बेड्सची क्षमता वाढवून 100 बेड करण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे नवे ईएसआय हॉस्पिटल उभारण्यासाठी बेळगावच्या मच्छे, उद्यमबाग भागात 5 एकर जमीन मंजूर करावी अशी विनंती ईएसआयसीने राज्य सरकारला केली आहे.