बेळगाव लाईव्ह :तिची सर्जनशील कला आणि पर्यावरणाबद्दलच्या प्रेमाने तिला कांहीतरी वैशिष्ट्यपूर्ण करण्यास प्रवृत्त केले. 23 वर्षीय आर्किटेक इंजीनियरिंग विद्यार्थीनी असलेली बेळगावची योशिता मंदार आजगांवकर ही आकर्षक लक्षवेधी पर्यावरण पूरक राख्या बनवते, ज्या रक्षाबंधन सणादरम्यान भावांना वृक्षारोपण करून परिसरात ‘हिरवाई’ आणण्यास प्रोत्साहित करतात.
बेळगाव शहरातील गोगटे अभियांत्रिक महाविद्यालयातील शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या योशिता हिला लहानपणापासूनच पर्यावरण आणि हस्तकलेबाबत आकर्षण होते. यामुळेच कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय हस्तकला निर्मितीमधील तिचे कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत झाली.
या संदर्भात बोलताना योशिता म्हणाली की, माझ्या शिक्षकाने एक दिवस माझे हस्त कौशल्य पाहिले आणि त्या कौशल्याचा वापर करून मला रक्षाबंधनाच्या राख्या बनवण्यास प्रवृत्त केले. ज्यामुळे मी ‘युनिक्स बाय योशिता’ या बॅनर खाली राख्या बनवण्यास सुरुवात केली. कोरोना प्रादुर्भाव काळात घराबाहेर पडण्यास निर्बंध असल्यामुळे त्या काळात ती घरबसल्या पर्यावरण पूरक राख्या बनवण्यात व्यस्त होती. या काळात तिने ‘सिड राखी हॅम्पर्स’ अर्थात बियाणं राखीचा करंडा निर्मितीमध्ये यश मिळवले, जी 2021 मधील नवी संकल्पना होती.
सदर प्रत्येक हॅम्परची किंमत 175 रुपये इतकी आहे. हाताने बनविलेल्या ग्रीटिंग टॅग असलेल्या तागाच्या पोटलीमध्ये (पिशवी) खास असे काथ्याचे भांडे, विस्तारण्यायोग्य कोको पीट डिस्क, राखीमध्ये दडविलेल्या झेंडूच्या बिया, वापराचे माहिती पत्र आणि हाताने बनवलेली आकर्षक डिझाईनच्या खास राख्या असे या हॅम्परचे स्वरूप असल्याचे योशिताने सांगितले
आपले हे उत्पादन 2021 मध्ये ऑनलाइन नेटवर्कच्या व्यासपीठावर आणताच देशाच्या विविध भागातून आपल्याला राखीच्या 300 हून अधिक ऑर्डरी मिळाल्याचे तिने सांगितले. आपण 45 ते 150 रुपये किमतीपर्यंतच्या आकर्षक पर्यावरण पूरक राख्या देखील बनवतो. परंतु यावर्षी राख्या बनवताना मी भारतीय कलेवर अधिक भर दिला आहे असेही योशिताने स्पष्ट केले. योशिता म्हणजे ‘यशस्वी महिला’ असे सांगून आपण 100 हून अधिक विविध डिझाईनच्या राख्या बनवलेल्या आहेत.
ज्यामध्ये पेठा राखी, चिकन माती (क्ले) मोरपंख राखी, खूण फॅब्रिक राखी, लेहरिया फॅब्रिक राखी, इंडियन लिंपन आर्ट राखी, मोती राखी, ईव्हिल आय राखी आदी विविध प्रकारच्या राख्यांचा समावेश आहे.
या सर्व राख्या भारतीय कलेच्या संकल्पनेवर आधारित असून राखी संपूर्ण तयार करण्यापासून ते पॅकिंगपर्यंत सर्व गोष्टींमध्ये हस्तकलेचा वापर केलेला आहे, अशी माहितीही योशिता आजगांवकर हिने दिली.