देशातील मुंबईसारख्या महानगरांमध्ये फार पूर्वीपासून उपलब्ध असलेली इलेक्ट्रिक अर्थात विजेवर धावणारी लोकल रेल्वेची सुविधा आता बेळगाव मध्येही प्रत्यक्षात उपलब्ध होत आहे. बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच बेळगाव रेल्वे स्थानकामधून काल मंगळवारी इलेक्ट्रिक इंजिनची रेल्वे धावली.
मागील महिन्याभरापासून बेळगाव रेल्वे स्थानक ते अनगोळपर्यंतच्या विद्युतीकरणाचे काम सुरू होते. विद्युत वाहिन्या ओढणे, जंक्शन बसवणे अशी कामे सुरू होती. लोंढा रेल्वे स्थानक आणि त्यापुढील काम पूर्ण झाले असले तरी बेळगाव -लोंढा दरम्यानचे रेल्वे विद्युत वाहिनीचे काम रखडले होते. लोंढ्याजवळ घनदाट जंगल असल्यामुळे विद्युतीकरणाच्या कामात अडथळे निर्माण होत होते. तथापि नैऋत्य रेल्वेने सदर काम युद्ध पातळीवर पूर्ण केले आहे. त्यामुळे काल मंगळवारी दुपारी 1 वाजता बेळगाव -मनूगुरू एक्सप्रेस रेल्वे विद्युत इंजिनवर धावली. बेळगाव रेल्वे स्थानकाच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेवर चालणारे रेल्वेचे इंजिन रुळावरून धावल्यामुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये हर्षव्यक्त होत होता. बेळगाव येथून इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन कार्यरत झाल्यामुळे भावी काळात बेळगाव ते बेंगलोर मार्गावर हे इंजिन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकंदर रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे बेळगाव रेल्वे स्थानकाची कार्यक्षमता वाढणार आहे.
दरम्यान पुणे ते लोंढा या दरम्यानच्या रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे काम मागील कांही वर्षापासून सुरू होते. बेळगाव रेल्वे स्थानकापासूनच्या विद्युतीकरणामुळे रेल्वे वाहतुकीची गती वाढणार असून प्रदूषण ही टळणार आहे. देशाच्या इतर भागात विजेवरील रेल्वे इंजिन धावत असताना बेळगावमध्ये मात्र त्याबाबतीत निराशाजनक स्थिती होती. यापूर्वी हुबळी -लोंढा मार्गावर विद्युत इंजिनिअर रेल्वे धावली होती.
त्यामुळे बेळगावचे काम केंव्हा पूर्ण होणार? याची प्रतीक्षा होती ही प्रतीक्षा आता संपली असून आता बेळगाव येथून विजेवर चालणारी रेल्वे सेवा सुरू झाली आहे. काल बेळगाव रेल्वे स्थानकावर विद्युत इंजिनसह दाखल झालेल्या बेळगाव -मनूगुरू एक्सप्रेस रेल्वेचे प्रवाशांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
देशात 1890 साली मीटर गेज दगडी कोळशाच्या रेल्वेने रेल्वे वाहतुकीची सुरुवात झाली. रेल्वेचा हा प्रवास बेळगावात आता 2023 साली इलेक्ट्रिक रेल्वेपर्यंत पोहोचला आहे. मात्र ब्रिटिश काळापासूनच्या रेल्वेच्या पाऊलखुणा आजही गरिबांचे महाबळेश्वर बेळगावमध्ये जिवंत आहेत.
सर्वात प्रारंभी मीटर गेज रेल्वे रुळावरील धुरांच्या लाटा हवेत सोडत दगडी कोळशावर चालणारी झुक झुक रेल्वेगाडी, मग देशाचे स्वातंत्र्य, पुढे मीटर गेजवरील डिझेल इंजिनची रेल्वे, 1990 नंतर ब्रॉड गेजसह डिझेल इंजिन रेल्वे आणि आता इलेक्ट्रिक विजेवर चालणारी रेल्वे असा बेळगावातील रेल्वेचा एकंदर प्रवास आहे आहे. रेल्वेचा हा प्रवास पाहता कोणाला माहित भविष्यात बेळगावमध्ये बुलेट ट्रेनही दाखल होईल.