बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील शेतकरी आणि जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या यंदा निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण अर्ज दाखल केलेल्या 55 उमेदवारांपैकी 14 जणांनी माघार घेतली त्यानंतर 41 जण रिंगणात आहेत.
या सहकारी साखर कारखान्यासाठी संचालकपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता वाढली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत इच्छुकांची बैठक घेऊन परस्पर संमतीने माघारीसाठी प्रयत्न सुरू होते. पण, दुपारी 3 वाजेपर्यंत चौदा जणांनी उमेदवारी मागे घेतली होती. त्यामुळे दोन पॅनेलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.
मार्कंडेय कारखान्यात 15 जागांसाठी 55 जणांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत सर्वांचे अर्ज वैध ठरले. उमेदवारी माघारीसाठी सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत होती.
या काळात चौदा जणांनी अर्ज मागे घेतले. पण, सहकारी तत्वावर चालणार्या या कारखान्यात निवडणूक होऊ नये, यासाठी काही जणांनी परस्पर संमतीने माघार घ्यावी आणि निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काही जणांकडून प्रयत्न सुरू होते.
त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. माघार घेणार्यांची संख्या कमी असल्यामुळे कारखान्यासाठी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्याकडे सभासदांचे लक्ष लागून आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांना एकाच गटात घालण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले पण दोघेही वेगवेगळ्या गटात गेले आहेत त्यामुळे सत्ताधारी गटातील दोन मोठे चेहरे वेगवेगळ्या पॅनल मधून निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या कारखान्यासाठी निवडणूक झाल्यास विद्यमान संचालक दोन पॅनल मध्ये विभागले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणते संचालक कोणत्या पॅनलमध्ये राहणार याबाबतही उत्सुकता लागून आहे.
रविवारी 27 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत सुमारे 3000 सभासद सहकारी होणार आहेत. त्यामुळे मंगळवारी बिनविरोध निवडी बाबत कोणताही निर्णय न झाल्यास ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.