बेळगाव शहरातील कोतवाल गल्ली, जालगार गल्ली येथील ड्रेनेज समस्या निवारणाच्या कामाला आज शुक्रवारी दुपारी आमदार राजू शेठ व स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत पोलीस संरक्षणात प्रारंभ करण्यात आला आहे.
बेळगाव शहरात जास्त पाऊस झाला तर वरच्या भागातील पाणी मोठ्या प्रमाणात गटारीतून वाहत जाऊन कोतवाल गल्ली भागातील घराघरात घुसत होते. त्यामुळे या भागातील लोकांनी मुख्य रस्त्यावरून येणारे पाणी रोखण्यासाठी कोतवाल गल्लीच्या कोपऱ्यावरील गटारच बंद केली होती. त्यामुळे काही दिवसांपासून ड्रेनेज तुंबण्याची समस्या निर्माण झाली होती.
येथील ड्रेनेज चेंबर मधून सांडपाणी व केरकचरा रस्त्यावर वाहत होता. या समस्येमुळे या भागातील रहिवासी अतिशय त्रस्त झाले होते. त्यातूनच स्थानिक रहिवाशांत काल जोरदार वादावादी होऊन पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी मनपा अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पाहणीअंती आमदार राजू सेठ यांच्या आदेशावरून जालगार गल्ली आणि कोतवाल गल्ली या दोन्ही बाजूने सीडी वर्क करण्याच्या कामाला आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रारंभ करण्यात आला.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मार्केट स्थानकाच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या संरक्षणात सीडी वर्कचे काम सुरु करण्यात आले आहे.
याप्रसंगी स्थानिक नगरसेवक मुजम्मिल डोणी आणि अफरोज मुल्ला तसेच मनपा अधिकारी उपस्थित होते. ड्रेनेजची समस्या निवारण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.