ड्रेनेज पाईपलाईन तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर आल्याची घटना शहरातील जालगार गल्ली आणि परिसरात घडल्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज गुरुवारी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन ड्रेनेज साफसफाईचे काम हाती घेतले. युद्धपातळीवर सुरू असलेले हे काम साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होते.
बेळगाव महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी वेळच्यावेळी शहरातील गटारी व नाल्यांची साफसफाई केली जात नाही. परिणामी गटारातील पाणी रस्त्यावर येऊन त्याचा त्रास सातत्याने शहरवासीयांना सहन करावा लागतो. सध्याच्या पावसाळी मोसमामुळे जालगार गल्ली, कोतवाल गल्ली, दरबार गल्ली परिसरात हीच समस्या उद्भवली आहे.
याबाबत नागरिकांनी जोरदार आवाज उठवताच महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच युद्धपातळीवर संबंधित परिसरातील ड्रेनेजच्या साफसफाईची काम हाती घेतले.
यावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व मतं जाणून घेतली. याप्रसंगी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या अनुषंगाने सांडपाण्याचा निचरा देखील मोठ्या प्रमाणात होतो. मात्र त्या तुलनेत शहरातील गटारी अरुंद आहेत. शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी जी पूर्वीची गटारे होती तीच आजतागायत कायम आहेत, त्यामध्ये कोणती सुधारणा करण्यात आलेली नाही.
त्यामुळे गटारी तुंबण्याची समस्या उद्भवत आहे. शहराच्या प्रभाग क्र. 2 व 3 मधील कोतवाल गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली परिसरामध्ये कोर्ट कंपाउंडपासून चव्हाट गल्ली वगैरे भागातील सांडपाणी वाहून येत असते. परिणामी साफसफाई अभावी ड्रेनेज व गटारी तुंबत असतात. पावसाळ्यात तर ही समस्या 200 पटीने गंभीर होते. कोतवाल गल्लीच्या पुढे बाजारपेठ आहे. या ठिकाणच्या रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना सांडपाण्यात भाजी ठेवून त्याची विक्री करावी लागत आहे.
वरच्या बाजूला मुख्य सीडी वर्कच्या ठिकाणी तिन्ही बाजूच्या गटारी खुल्या करण्यात आल्या नसल्यामुळे या भागात गेल्या 8 वर्षापासून गटारी व ड्रेनेज तुंबण्याच्या हा प्रकार घडत आहे, अशी तक्रार स्थानिकांनी केली. सगळ्यात तक्रार एकून घेऊन वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान ड्रेनेज व गटारीचे सांडपाणी तुंबण्याच्या घटनेसंदर्भात बेळगाव लाईव्ह समोर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नगरसेवक मुज्जमिल डोणी यांनी जालगार गल्ली येथे गटारीचे सांडपाणी रस्त्यावर राहण्याचा जो प्रकार घडत आहे त्याला कारणीभूत प्रभाग क्र. 1, 2, 5 या ठिकाणी असलेली एकमेव मुख्य गटार असल्याचे सांगितले. सदर गटारीचे पाणी कोणीतरी अडवल्यामुळे आसपासच्या गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आले आहे. या भागाचे आम्ही तीनही नगरसेवक आमदार असिफ सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. कोतवाल गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली या ठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबून रस्त्यावर सांडपाणी येण्याचा प्रकार घडला आहे.
आम्ही तीनही नगरसेवक निश्चितपणे ही समस्या सोडवू असे आश्वासन दिनाबरोबरच दरम्यान आतापर्यंत नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत असेही नगरसेवक डोणी यांनी विनम्रपणे स्पष्ट केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शकील मुल्ला व इतर उपस्थित होते. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील नागरी समस्या संदर्भात सातत्याने आवाज उठवत असल्याबद्दल बेळगाव लाईव्हला धन्यवाद दिले.