सुस्त महापालिका, निद्रिस्त अधिकारी आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधींमुळे आरपीडी कॉर्नर टिळकवाडी येथील गेल्या कांही वर्षापासून दुर्लक्षित असणारी तुंबलेल्या गटारीची समस्या आता पावसामुळे अधिकच गंभीर बनली आहे. सध्या आरपीडी चौकातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र गलिच्छ सांडपाणी वाहत असल्यामुळे वाहन चालक व पादचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून आता तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
फार पूर्वीपासून टिळकवाडी येथील आरपीडी कॉर्नर हा बेळगाव शहराची ओळख सांगणाऱ्या ठिकाणांपैकी मानला जातो. अशा या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चौकातील गेल्या कांही वर्षापासून भेडसावणाऱ्या गटारीच्या समस्येकडे मात्र महापालिका स्मार्ट सिटी आणि लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
येथील रस्त्याच्या एका बाजूची गटार ड्रेनेज लाईनला व्यवस्थित जोडण्यात आलेली नाही. परिणामी कायम तुंबलेल्या या गटारीतील सांडपाणी पूर्वी रस्त्यावरून वाहत होते. वारंवार तक्रार करून देखील गटारीची दुरुस्ती करण्यात येत नसल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर देऊ नये यासाठी आसपासच्या नागरिक व दुकानदारांनी माती टाकून बांध घातला होता. त्यामुळे रस्त्याशेजारी कायम सांडपाण्याचे डबके निर्माण झालेले पहावयास मिळायचे.
या डबक्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरून डास, माशांचा प्रादुर्भाव वाढलेला असतो. यापूर्वी अंदाज न आल्यामुळे या घाण डबक्यात कांही विद्यार्थी व नागरिक कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सदर गटारीची दुरुस्ती चौकातील रस्ता सुरक्षित व स्वच्छ ठेवावा यासाठी कांही सामाजिक संघटनांनी गांधीगिरीची आंदोलन देखील केली आहेत. मात्र अद्यापही कोणाकडूनही या गटारीची दखल घेण्यात आलेली नाही.
आरपीडी कॉर्नर येथील तुंबणाऱ्या गटारीच्या समस्येबाबत तक्रार करण्यास गेल्यास महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कायम एकमेकांकडे बोट दाखवत उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. या भागाचे लोकप्रतिनिधी तर साधी सहानुभूतीही न दाखवता अतिशय बेजबाबदारपणे उद्धट उत्तर देतात. यापूर्वी अनेकदा याची प्रचिती आल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिक देखील हतबल झाले आहेत. आता सध्याच्या पावसामुळे सदर गटारीच्या ठिकाणच्या डबक्याला घातलेला बांध भुईसपाट होऊन आरपीडी चौकातील संपूर्ण खानापूर रोडवर सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप होत आहे. रस्त्यावरील या गलिच्छ दुर्गंधीयुक्त पाण्यातून ये -जा करावी लागत असल्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या खेरीज सांडपाण्यामुळे संपूर्ण चौकात अस्वच्छता पसरली आहे. तेंव्हा आता तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरपीडी कॉर्नर येथील संबंधित गटारीची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.