बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतमध्ये पीडीओंची अर्थात पंचायत विकास अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती केली जावी अशी मागणी सदर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा लक्ष्मी येळगुकर व माजी अध्यक्ष चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारून अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पीडीओ नियुक्ती केली जाईल असे आश्वासन दिले.
आंबेवाडी ग्रामपंचायतला गेल्या दीड वर्षापासून पीडिओ नाही. या ठिकाणी यापूर्वी ग्रामपंचायतीचे पीडीओ म्हणून शिवाजी मडिवाळ हे काम करत होते. त्यांच्या कार्यकाळात आंबेवाडी गावातील बरीच कामे मार्गी लागली.
मात्र अलीकडे त्यांची बदली झाली असून अद्यापपर्यंत नव्या पीडीओंची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतचे काम ठप्प झाले असून ग्रामस्थांच्या कामातही अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे आंबेवाडी ग्रामपंचायतीमध्ये त्वरित नव्या पीडीओंची नियुक्ती केली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी माजी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील व नूतन ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी येळगुकर यांच्यासह उपाध्यक्ष शंकर सुतार, ग्रा.पं. सदस्य अर्जुन राक्षे, मधु चौगुले, नागेश चौगुले, नारायण लोहार ,लक्ष्मी सांबरेकर, सुवर्णा लोहार, आरती नावी, सुधा डोपे आदी उपस्थित होते.
नुकताच झालेल्या ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत आंबेवाडी ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने आपली सत्ता अबाधित ठेवली होती त्यामुळे समितीचा अध्यक्ष असल्यामुळे या ग्रामपंचायतीची मागणी किती लवकर मंजूर होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.