बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांचे पाहणी दौरे सुरूच असून त्यांनी इंदिरा कँटिनची पाहणी केली व हॉटेल्समध्ये भेटी देत स्वच्छता राखण्याच्या सूचना केल्या.
महापालिका आयुक्त दुडगुंटी यांनी शनिवारी (दि. 19) स्वच्छतेच्या आढाव्यासह इंदिरा कँटिन, गोशाळा, मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण केंद्र आणि अनेक हॉटेलना भेट देऊन विविध सूचना केल्या.
पहाटे साडे पाच वाजता आयुक्त दुडगुंटी यांनी सदाशिवनगर येथील वाहन शाखेत जाऊन वाहनधारकांची उपस्थिती तपासली. त्यानंतर आझम नगर बिट कार्यालयास भेट दिली. त्यांनी आझमनगर थेली इंदिरा कँटीनला भेट देऊन नाश्त्याच्या दर्जा तपासला. चांगल्या दर्जाचा आहार देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर नगरसेवक श्रेयस नाकाडी यांच्यासोबत आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर येथील कचराकोंडीची पाहणी केली. रस्त्याच्या कडेला कचर्याचे ढीग राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित निरीक्षकांना दिले.
स्वच्छता राखण्यासाठी निरीक्षकांना मोकळ्या जागांच्या मालकांना नोटीसा बजावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यांनी हॉटेलला भेट देऊन मालकाला स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला.
आयुक्त दुडगुंटी यांनी श्रीनगर येथील गोशाळा आणि मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरण केंद्राला भेट देऊन माहिती घेतली.
अधिक प्रमाणात भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर त्यांनी श्रीनगर उद्यानाला भेट दिली, कंपाऊंडच्या बांधकामासाठी संबंधित अधिकार्यांना अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या.