बेळगाव लाईव्ह :नव्याने बांधण्यात आलेल्या अनगोळ वडगाव रोडची गटार पुन्हा दुरुस्त करा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहाय्यक अभियंत्याकडे करण्यात आली आहे.
बेळगाव शहराचा विकास झपाट्याने होत असला तरी विकास कामांचा दर्जा त्या तोडीचा नाही त्याचाच एक नमुना अनगोळ वडगाव रोड वर समोर आला आहे.
गेल्या पंधरा दिवसापूर्वी पावसाने रस्ता खचला होता त्यावेळी या रस्त्याच्या कामाचा दर्जा सर्वांच्या समोर आला होता आता त्याच भागातील गटारींच्या बाबत देखील तक्रार समोर आली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केलेल्या तक्रारीनुसार वडगाव अनगोळ रोडवर वैज्ञानिक पद्धतीने गटारीचे बांधकाम करण्यात आलेले नाही आणि कामाचा दर्जा देखील सुमार आहे. गटारीच्या कामावेळी एका बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी उतार करण्याची गरज होती मात्र तशा पद्धतीने गटारीचे काम करण्यात आलेले नाही त्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी थांबून राहते आजूबाजूच्या घरामध्ये देखील सांडपाणी शिरत आहे अशी तक्रार करण्यात आली आहे.
सांडपाणी उघड्यावर असल्याने या भागातील लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे याची दखल घेत पुन्हा एकदा या भागातल्या गटारी दुरुस्त कराव्यात अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहायक अभियंत्याकडे करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी बांधकाम खात्याचा उच्च अधिकाऱ्याकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे, महापालिका आयुक्ताकडे याबाबत देखील तक्रार देखील नोंदवली आहे.यावेळी उमाकांत पाटील, रायकर योगेश चौथाई आदी नागरिक उपस्थित होते.