बेळगाव लाईव्ह : चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार नंदी महाराज खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी आज चक्क सीआयडीचे पोलीस महासंचालक ( एडीजीपी) डॉ एम ए सलीम यांनी फिल्डवर उतरले आहेत.
शनिवारी एडीजीपी सलीम यांनी बंगळूरहुन येऊन तालुक्यातील हिरेकोडी येथील नंदी पर्वत आश्रम, कटकभावी, माविनहोंड व चिकोडी येथे भेट देऊन माहिती घेऊन तपास केले.
जैन मुनी कामकुमार नंदी महाराज खून प्रकरणाचा तपास राज्य सरकारने पोलीस खात्याकडून सीआयडी हस्तांतर केला होता. त्यानंतर सीआयडीचे आयजी प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली सीआयडी पथकाने तपास केला होता. त्यानंतर आज सीआयडीचे एडीजीपी सलीम यांनी भेट दिली.
त्यांनी चिकोडीसह खून झालेल्या हिरेकोडी आश्रमास, महाराजांचा मृतदेह तुकडे केलेल्या माविणहोंड डोंगर परिसर व मृतदेहाचे तुकडे फेकलेल्या कटकभावी येथील कूपनलिकेला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन तपास केला.
यावेळी सीआयडीचे आयजी प्रवीण पवार, बेळगांव उत्तर विभागाचे आयजीपी विकासकुमार, एसपी संजीव पाटील, सीआयडी एसपी व्यंकटेश, डीवायएसपी बसवराज यलिगार व इतर अधिकारी उपस्थित होते.