बेळगाव लाईव्ह: भारताची ‘ चंद्रयान -3’ मोहीम काल बुधवारी यशस्वी झाली आणि हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहून ठेवला गेला. विशेष म्हणजे या अंतराळ मोहिमेत बेळगावच्या सर्व्हो कंट्रोल्स अँड टेक्नॉलॉजी या कंपनीचा देखील महत्त्वाचा वाटा आहे, अशी माहिती या कंपनीचे संचालक दीपक धडोती यांनी दिली.
शहरात आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. इस्रोने बनवलेले चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेले भारताचे चांद्रयान -3 तसेच त्यासाठीचे रॉकेट आणि विक्रम लँडर यांचे कांही विशिष्ट महत्त्वाचे भाग बेळगावच्या सर्व्हो कंट्रोल्स अँड टेक्नॉलॉजी कंपनीने तयार केले आहेत. विक्रम लॅन्डरच्या हायड्रोलिक हालचालीसाठी बसविण्यात आलेले सेंसर सर्व्होने तयार केले आहेत.
हे सेंसर विक्रम लँडरचे सोलार पॅनल उघडल्यानंतर कार्यरत होतात. त्यामुळे चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेमध्ये देशातील संबंधित इतर कंपन्यांप्रमाणेच सर्व्हो कंट्रोल्सचाही महत्त्वाचा वाटा आहे. सर्व्हो कंट्रोल्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी गेल्या अनेक वर्षापासून इस्रो सोबत काम करत आजच्या घडीला चांद्र यानाच्या यशापर्यंत पोहोचली आहे असे सांगून इस्रोकडून सध्या भविष्यातील गगनयान मोहिमेची तयारी सुरू आहे. या गगनयानाचे कांही महत्त्वाचे घटक तयार करण्याची ऑर्डर यापूर्वीच सर्व्हो कंट्रोल्स अँड टेक्नॉलॉजीला मिळाली असल्याची माहितीही धडोती यांनी दिली.
मोतीचंद लेंगडे भरतेश पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाच्या सॅटॅलाइट लॅब अर्थात उपग्रह प्रयोगशाळेबद्दल बोलताना विद्यार्थ्यांना आणि अवकाश संशोधक, अभियंते बनू इच्छिणाऱ्यांना अवकाश मोहिमांची कल्पना यावी, उपग्रह वगैरेची माहिती मिळावी या उद्देशाने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली असल्याचे दीपक धडोती यांनी सांगितले.
या प्रयोगशाळेला आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी भेट देऊन उपग्रह कशाप्रकारे काम करतात? उपग्रहाला कोण कोणते भाग असतात? याबाबतचे ज्ञान घेतले आहे. अभियांत्रिकी शाखेचे अनेक विद्यार्थी इंटर्नशिपसाठी या ठिकाणी येऊन मार्गदर्शन घेत असतात.
तसेच सध्या या प्रयोगशाळेशी संबंधित प्रदीप चिक्कमठ यांच्या नेतृत्वाखाली नॅनो सॅटॅलाइट प्रकल्पाची तयारी सुरू असल्याचे धडोती यांनी स्पष्ट केले.