महानगरपालिकेची परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी ‘अखंड हिंदू राष्ट्र संकल्प दिन’ अशा आशयाचे भित्तिपत्र लावल्याप्रकरणी साक्षीदारातील विसंगतीमुळे आरोपी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह अन्य तिघा जणांची बेळगाव येथील तृतीय प्रथमवर्गीय न्यायालयाच्या न्यायाधीश पल्लवी पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्यांची नावे रमाकांत कोंडुसकर (रा. गांधीनगर बेळगाव), आदिनाथ गावडे (रा. वडगाव), प्रवीण पिळणकर (रा. शहापूर) व सुनील कुरणकर (रा. अळवण गल्ली शहापूर) अशी आहेत.
सदर घटनेची माहिती अशी की, गेल्या 14 ऑगस्ट 2013 रोजी महापालिका आयुक्त प्रियांका फ्रान्सिस यांच्या मार्गदर्शनानुसार महसूल निरीक्षक फिर्यादी पी. एन. लोकेश यांनी महापालिकेची परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी भित्तिपत्र चिटकवल्याबद्दल उपरोक्त चौघाजणांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती.
त्याची नोंद घेत शहापूर पोलिसांनी महानगरपालिकेची परवानगी न घेता 13 व 14 ऑगस्ट 2013 रोजी ‘अखंड हिंदू राष्ट्र संकल्प दिन चलो टिळक चौक बेळगाव’ अशा आशयाचे भित्तीपत्रक सार्वजनिक ठिकाणी चिकटवल्या प्रकरणी आरोपींवर कलम 3, 4, 5 प्रिव्हेन्शन ऑफ ओपन प्लेस डिसफिगरमेंट ॲक्ट कायद्याअंतर्गत कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते.
सार्वजनिक ठिकाणी पोस्टर अर्थात भीत्तीपत्र लावल्याप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सरकारी पक्षातर्फे न्यायालयामध्ये सादर केलेली व्हिडिओ सीडी आणि सहा साक्षीदार तपासण्यात आले होते.
तथापि साक्षीदारांमधील विसंगतीमुळे न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली सर्व संशयित आरोपींच्या वतीने ॲड. प्रताप यादव व ॲड. हेमराज बेंचन्नावर यांनी काम पाहिले.