हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने तेथील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबद्दलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात त्या कैद्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत शेखर मोगवीर असे गुन्हा दाखल झालेल्या कायद्याचे नांव आहे. प्रशांत याला कुंदापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हिंडलगा कारागृहातील कैदी नंबर 3378 असणाऱ्या प्रशांत मोगवीर याने कारागृहात राहूनच तेथील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांबद्दल बोललेला व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ गेल्या 3 ऑगस्ट रोजी सकाळी खाजगी कन्नड वृत्तवाहिन्याला दिल्याने त्यांनी तो प्रसारित केला होता.
कारागृहात मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या वापरावर निर्बंध आहेत. तरीदेखील व्हिडिओ चित्रीकरण करत सोशल मीडियावर तो व्हायरल केल्याप्रकरणी कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक शहाबुद्दीन के. यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शंभर वर्षे पूर्ण केलेले हिंडलगा येथील मध्यवर्तीय कारागृह सध्या वेगवेगळ्या कारणांनी ठळक चर्चेत येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याच कारागृहातून जयेश पुजारी याचा खंडणीसाठी धमकीचा फोन गेला होता त्या पाठोपाठ अतिरेकी अफसर पाशा हा देखील हिंडलगा कारागृहात राहून इतर कारवायांमध्ये गुंतल्याचे तपासात पुढे आले आहे. तर दोनच दिवसांपूर्वी कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारीची घटना घडली होती.