स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संजीवनी फाउंडेशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर आज सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसादासह मोठ्या उत्साहात पार पडले.
संजीवनी फाउंडेशनतर्फे गेल्या तीन वर्षापासून स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. यंदा उद्याच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या त्यांच्या रक्तदान शिबिराचा लाभ घेत 50 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराद्वारे संकलित केलेले रक्त बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीला देण्यात आले. यावेळी ‘ओ -निगेटिव्ह’ हा दुर्मिळ रक्तगट असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी देखील आवर्जून रक्तदान केले.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आर. एम. चौगुले म्हणाले की, समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा या उद्देशाने दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही हे रक्तदान शिबिर भरवतो. दरवेळी या शिबिराला रक्तदात्यांचा भरघोस पाठिंबा मिळत असतो. यावेळी देखील तो मिळाला आहे. आज मी देखील रक्तदान केले आहे. माझा रक्तगट ‘ओ -निगेटिव्ह’ हा आहे जो दुर्मिळ असल्यामुळे लोकांना मदत करण्यासाठी मी जाणूनबुजून वर्षातून किमान दोन वेळा आणि गरज पडल्यास सरासरी 3 महिन्यातून एकदा रक्तदान करतो.
रक्तदान केल्यामुळे नवे रक्त व नव्या पेशी निर्माण होऊन आपले आरोग्य तंदुरुस्त राहते. वयाच्या पन्नाशीच्या पुढे केलेल्या रक्तदानामुळे हृदयविकाराचा झटका किंवा मोठा रोग होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे सशक्त असणाऱ्या प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे.
बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य गोरगरीब रुग्ण उपचार घेत असतात. यापैकी बऱ्याच जणांना रक्ताची गरज असते. त्यासाठी रक्तदान शिबिराद्वारे संकलित केलेले रक्त आम्ही हेतूपूर्वक फक्त बीम्स हॉस्पिटललाच देत असतो. सर्वसामान्य लोकांना रक्त कमी पडू नये असा प्रयत्न आम्ही संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतो.
रक्तदान हे महादान आहे ते केल्यामुळे माणसाला जीवदान मिळते आणि हे पुण्य मोठे आहे. रक्तदानातून आपण ते पुण्य कमावले पाहिजे असे सांगून आर. एम. चौगुले यांनी सर्वांना रक्तदानाचे आवाहन केले. रक्तदाना खेरीज सदर शिबिरात महिलांच्या हिमोग्लोबिनची तपासणी देखील करण्यात आली.
तसेच शरीरातील हिमोग्लोबिन कशाप्रकारे वाढवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संजीवनी फाउंडेशनच्या सदस्यांसह बीम्स हॉस्पिटलच्या डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.