केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने गावागावात जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. दरम्यान ही योजना 24 तास पाणीपुरवठा करेल असे अनेकांना वाटले होते.
मात्र सद्यस्थिती पाहता जलजीवन मिशन योजना आणि नळांना पाणीच येईना अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापुढे तरी नळांना पाणी पडेल असे नियोजन प्रशासनाने करावे, अशी मागणी होत आहे.
यावर्षी मानसून लांबल्याने पाण्यासाठी अनेकांना भटकंती करावी लागत होती. दरम्यान जिल्ह्यात बहुतांश गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. मानसून तब्बल दीड महिना लांबल्याने पाणी मिळणे कठीण झाले होते. याचबरोबर प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या विविध योजना ही कुचकामी ठरल्या होत्या.
जलजीवन मिशन योजना ही महत्त्वकांक्षी योजना म्हणून राबवली गेली. मात्र प्रत्यक्षात नळांना पाणीच आले नाही. त्यामुळे अशा योजना राबवण्याऐवजी नागरिकांची सोय करण्यावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत मध्ये जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली आहे. मात्र त्याचे योग्य नियोजन नसल्याने अनेक ठिकाणी बसवण्यात आलेले नळ कुचकामी ठरले आहेत तर काही ठिकाणी नळांना पाणीच येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जलजीवन मिशन योजना नेमकी कशासाठी राबविण्यात आली हाच प्रश्न नागरिकांना पडला आहे. जर नळांना पाणीच येत नसेल तर ही योजना राबवण्यामागचे गौडबंगाल काय असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
दरम्यान ज्या ठिकाणी नळाला पाणी येत आहे ते कमी दाबाने येत असून केवळ अर्धा तास हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे अशा योजना कुचकामी ठरू लागल्या आहेत. सध्या जलजीवन मिशन योजना केंद्र सरकारने राबवली असली तरी ग्रामपंचायतीने त्याची देखरेख करणे गरजेचे होते. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे.